श्री मकाई कारखाना यावर्षीचा गळीत हंगाम पूर्ण क्षमतेने चालणार – भांडवलकर
करमाळा
तालुक्यातील श्री मकाई सहकारी साखर कारखान्याचा सन २०२५-२६ चा गळीत हंगामात कारखाना पुर्ण क्षमतेने चालवून गळीत हंगाम यशस्वीपणे पार पाडणार असल्याची माहिती कारखान्याचे चेअरमन दिनेश अंबादास भांडवलकर यांनी दिली. यावेळी कारखान्याचे सर्व संचालक, कार्यकारी संचालक व जनरल मॅनेजर उपस्थित होते.

यावेळी पुढे बोलताना चेअरमन म्हणालेकी कारखान्याचे ऊस उत्पादक सभासद, ऊस तोडणी वाहतुकदार व कर्मचारी हे आमच्या कारखान्याच्या व्यवस्थापनाचा परिवाराचाच भाग असून आतापर्यंत कारखाना व्यवस्थापणाने वेळोवेळी सर्वांच्या हिताचा निर्णय घेतलेला आहे. त्याचाच भाग म्हणून राष्ट्रीय सहकार विकास निगम (एन.सी.डी.सी.) नवी दिल्ली यांनी मंजूर केलेल्या कर्ज रक्कमेपैकी कामगारांच्या थकीत पगाराबाबतीत सकारात्मक निर्णय घेऊन एन.सी.डी.सीचे मार्गदर्शक तत्वानुसार थकीत वेतनाची रक्कम वार्षिक २५ टक्के प्रमाणे अदा करण्यात येणार आहे. त्यामुळे कारखान्यातील उर्वरीत कर्मचारी यांनी तातडीने आपापल्या कामावर हजर होण्याचे आवाहन चेअरमन यांनी या प्रसंगी केले.

तसेच ऊस तोडणी वाहतुक यंत्रणेचे करार करण्याचे काम पुर्ण झालेले असून कर्मचाऱ्यांनी पूर्ण क्षमतेने आपापले योगदान देवून येणारा गळीत हंगाम वेळेत सुरु करावा जेणेकरुन आपल्या तालुक्यातील ऊस उत्पादकांची इतर कारखान्याकडून सर्व बाबतीत होणारी पिळवणून थांबवता येईल. सुदैवाने यावर्षीचा गळीत हंगाम सुरु करण्यासाठी वातावरण चांगले आहे. ऊस उत्पादक शेतकरी कारखान्याचे मालक आहेत कारखाना सुरु करण्यास उशीर झाल्यास त्यांच्या ऊस तोडणीवरती परिणाम होऊ शकतो तसे होवू न देणेची काळजी सर्व घटकांनी घेणे आवश्यक आहे. त्यामुळे उर्वरीत कर्मचारी यांनी व्यवस्थापनाने घेतलेल्या निर्णयाचा आदर करुन यावर्षीचा गळीत हंगाम यशस्वीपणे पार पाडण्यासाठी आपले योगदान द्यावे असेही आवाहन चेअरमन यांनी योवेळी केले.