प्रतिबंधित तंबाखू पान मसाला वाहतुक ; करमाळा पोलिसांनी एकास वाहनासह ताब्यात घेतले
करमाळा समाचार
जातेगाव तालुका करमाळा या ठिकाणी संभाजीनगर जिल्ह्यातील एकास प्रतिबंधित तंबाखू पान मसाला घेऊन जात असताना करमाळा पोलिसांनी एकास वाहनासह ताब्यात घेतले आहे. यावेळी त्याच्याकडून ११ लाख २१ हजार ७५० रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. त्यामध्ये तीन लाख २१ हजार ७५० रुपयांचा साठा मिळाला आहे. सदरची सदरची कारवाई पोलीस निरीक्षक रणजीत माने यांच्या मार्गदर्शनाखाली दि २८ जुलै रोजी दुपारी दीडच्या सुमारास करण्यात आली आहे.

राजेंद्र विनायक बाविस्कर रा. देवडाळी जिल्हा छत्रपती संभाजी नगर असे ताब्यात घेतलेल्या इसमाचे नाव आहे. त्याच्याकडून तंबाखूचे एकूण १६५० पाकिटे, हिरा पान मसाल्याचे १६५० पाकिटे व आठ लाख रुपये किमतीचे वाहन महिंद्रा कंपनीची कार ताब्यात घेण्यात आली आहे. सदर प्रकरणी रेणुका रमेश पाटील, अन्न व औषध प्रशासन विभाग यांनी तक्रार दाखल केली आहे.
याबाबत अधिक माहिती अशी की, गोपनीय बातमीदाराकडून गुटखा वाहतूक होत असल्याची माहिती करमाळा पोलिसांना मिळाली. त्यानंतर पोलीस निरीक्षक रणजीत माने यांनी पथक जातेगाव च्या दिशेने पाठवले. यावेळी जातेगाव तालुका करमाळा येथे वाहन क्रमांक एम एच २० एफ यु ७२४६ हे वाहन मिळून आले. त्यामध्ये प्रतिबंधित तंबाखू पान मसाला व अन्नपदार्थाची वाहतूक करत असल्याचे दिसून आले. सदरची कार्यवाही पोलीस नाईक मनिष पवार, पोलीस कॉन्स्टेबल गटकुळ, शेरखाने, रंदिल, येवले यांच्या पथकाने केली आहे. सदर घटनेचा पुढील तपास मनीष पवार हे करीत आहेत.

