दिलासा देत येत नसेल तर कमीतकमी शेतकऱ्यांच्या जखमेवर मिठ तरी चोळु नका
करमाळा समाचार
मोठ्या प्रमाणावर झालेल्या पावसामुळे परंडा व करमाळ्याच्या सीमेवर असलेल्या सीना नदीला महापूर आलेला असताना सध्या मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री व मंत्र्यांच्या भेटीगाठी वाढलेला आहेत. तर शेतकरी मेटाकुटीला आला असून नेत्यांकडून अपेक्षा करत आहे. अशा परिस्थितीतही सामाजिक न्याय विभागाचे मंत्री संजय शिरसाट हे औपचारिकता म्हणून अतिवृष्टी भागाची पाहणी करण्यासाठी येत असल्याचे दिसून येत आहे. अतिवृष्टी भागातील लोकांना दिलासा देण्याऐवजी विविध कार्यक्रम घेऊन शेतकऱ्यांच्या जखमेवर मीठ चोळण्याचे काम होताना दिसत असल्याचे प्रतिक्रिया आता जनतेतून उमटू लागल्या आहेत.

नुकतेच उपमुख्यमंत्री अजित दादा पवार यांनी करमाळा येथील कोर्टी व संगोबा परिसरातील अतिवृष्टी भागाची पाहणी केली व पुढील पाहणी करण्यासाठी ते निघून गेले. परंतु शिवसेना नेते सामाजिक न्याय मंत्री संजय शिरसाट हे देखील आज करमाळा येथे येत असल्याने त्यांचा दौरा जाहीर करण्यात आला आहे. परंतु सदर दौऱ्याच्या अनुषंगाने केवळ एक तासाचा वेळ हा अतिवृष्टी भागासाठी दिला असून साधारण सायंकाळी सात वाजेपर्यंत ते करमाळा येथे विविध कार्यक्रमात उपस्थिती दाखवणार आहेत.
तालुक्यात एकीकडे भीषण परिस्थिती निर्माण झालेली असताना सामाजिक न्यायाचे मंत्री मात्र शेतकऱ्यांच्या सोबत उभारण्याऐवजी विविध विकास कामे, भेटीगाठी व उद्घाटन शिवाय लोकार्पणाच्या कार्यक्रमाच्या निमित्ताने शहरात थांबून राहणार आहे. शिवाय शेतकऱ्यांसोबत जाऊन बांधावरील अडचणी पाहण्यापेक्षा लांबूनच सांत्वन करून विविध उपक्रमात मशगुल राहणार असल्याचे दिसून येत आहे. शेतकऱ्याच्या चुलीत पाणी असताना कार्यक्रम कसे आयोजीत करता असा सवाल उपस्थित होत आहे. त्यामुळे शेतकरी वर्गात नाराजी व्यक्त केली जात आहे.

मागील दोन दिवसांपासून पाण्यात अडकून राहिलेल्या नागरिकांचे जलजीवन विस्कळीत झाले आहे. शेतकरी हवालदिल झाला आहे. शेतकऱ्यांना सध्या आर्थिक मदतीची अपेक्षा असून तुटपुंजी मदत न करता सगळे हाताने व सरसकट मदत करावी अशी मागणी शेतकऱ्यांमधून होत आहे. अशा परिस्थितीत मंत्री महोदय अजूनही पक्ष वाढीसाठी शेतकरी मेळावे उद्घाटने व लोकार्पण सोहळे घेत आहेत. याशिवाय अडचणीत असलेल्या शेतकऱ्यांना दिलासा देण्याऐवजी जाहीर शेतकरी मेळावा घेऊन पक्ष वाढीसाठी प्रयत्न हे कितपत योग्य आहेत अशी टीका सामान्यातून होऊ लागली आहे.
याशिवाय तालुक्यातील नेते मंडळींनीही सध्या विविध कार्यक्रम घेण्याऐवजी शेतकऱ्यांच्या अडचणीवर लक्ष केंद्रीत करणे गरजेचे आहे.
प्रतिक्रिया
नदीच्या कडेला तर सोडाच करमाळा शहराच्या लगत असलेल्या देवळाली भागातील शेतजमिनी मध्ये अतिवृष्टीमध्ये मुळे पाणी मोठ्या प्रमाणावर साठले आहे. यापूर्वी केळी शेती केल्यानंतर त्यात नुकसान आले. तर आता आंब्याची फळबाग लावल्यानंतर ही पाणी साठवून राहिल्याने जवळपास हेक्टरी दोन लाख रुपयांपेक्षा जास्त नुकसान झाले आहे. तरी शासनाने एकरी 50 हजार रुपये नुकसान भरपाई जाहीर करावी.
– ऱाजु घळके,
शेतकरी,देवळाली.
