करमाळाक्राईमसोलापूर जिल्हासोलापूर शहर

दुधाची उचल माघारी मागितल्याच्या कारणावरून दूध व्यावसायिकाला मारहाण; दोघांविरुद्ध तक्रार

बोरगाव बसस्थानकाजवळ लाकडी काठीने हल्ला; जिवे मारण्याची धमकी दिल्याचा आरोप

करमाळा : दूध संकलन व्यवसायातील उर्वरित उचल मागितल्याच्या कारणावरून झालेल्या वादात एका दूध व्यावसायिकाला शिवीगाळ करून लाथाबुक्क्यांनी तसेच लाकडी काठीने मारहाण केल्याची घटना बोरगाव बसस्थानकाजवळ घडली. याप्रकरणी हनुमंत विठ्ठल ढवळे (वय ३६, रा. बोरगाव, ता. करमाळा) यांनी २० ऑक्टोबर रोजी करमाळा पोलिस ठाण्यात तक्रार दिली आहे.

फिर्यादी हनुमंत ढवळे हे शेतीसह दूध संकलनाचा व्यवसाय करतात. त्यांच्या तक्रारीनुसार, गावातील त्रिंबक अनुरुद्र ढवळे याने त्यांच्याकडून सुमारे दीड वर्षापूर्वी ८८ हजार रुपये उचल घेतली होती. त्यापैकी ५५ हजार रुपये बाकी असल्याचे फिर्यादीचे म्हणणे आहे.

१८ ऑक्टोबर रोजी सकाळी साडेदहाच्या सुमारास दूध डेअरी बंद करून घरी जात असताना बोरगाव बसस्थानकाजवळ फिर्यादीची त्रिंबक ढवळे व त्याचे वडील अनुरुद्र ढवळे यांच्याशी भेट झाली. यावेळी फिर्यादीने उर्वरित पैसे कधी देणार, अशी विचारणा केली असता वाद झाल्याचे तक्रारीत नमूद आहे.

या वादातून दोघांनी शिवीगाळ करून लाथाबुक्क्यांनी मारहाण केली, असा आरोप आहे. तसेच त्रिंबक ढवळे याने पाठीमागून येऊन मान, पाठ, डोके व हातावर काठीने मारहाण करून जखमी केल्याचे फिर्यादीने म्हटले आहे. यावेळी उपस्थित असलेल्या तात्या पाटील, दीपक भोज व अजिनाथ ननवरे यांनी मध्यस्थी करून भांडण सोडविल्याचेही तक्रारीत नमूद आहे.

जाताना हातपाय मोडण्याची धमकी दिल्याचा आरोपही फिर्यादीने केला आहे. घटनेनंतर उपचार घेतल्यानंतर २० ऑक्टोबर रोजी त्यांनी पोलिस ठाण्यात तक्रार दिली.

या प्रकरणी पोलिसांकडून पुढील कायदेशीर कारवाई केली जाणार असून, घटनेबाबत पोलिस तपासातील अधिकृत तपशील उपलब्ध झाल्यानंतर प्रकरणाचे पुढील चित्र स्पष्ट होईल.

error: परवानगी शिवाय बातमी कॉपी करू नये. हा कायद्याने गुन्हा आहे !
WP Radio
WP Radio
OFFLINE LIVE