करमाळासोलापूर जिल्हासोलापूर शहर

निवडणूक व आंदोलन नेत्यांची वेगवेगळ्या भूमिका; शेतकरी आंदोलकात नाराजीचा सुर

करमाळा समाचार 

एकीकडे होऊ घातलेल्या निवडणुकांमध्ये सत्ताधारी पक्षासोबत मांडीला मांडी लावून बसलेल्या नेत्यांनी दुसरीकडे मात्र सरकारने नियोजित आणलेल्या योजनेला उघडपणे विरोध असल्याचे दाखवत शेतकऱ्यांना घडवण्याचं काम केलं जात असल्याचे चित्र सध्या दिसून येत आहे. खरंच या नेत्यांना शेतकऱ्यांसाठी लढायचं असेल तर सरकारला खुले आव्हान देऊन मैदानात दोन हात का करत नाहीत? हा मोठा प्रश्न आहे. विरोध करण्याचा देखावा करायचा व उद्योजकांच्या घशात घालण्यासाठी ‘मी लढलो पण उपयोग झाला नाही’ हे दाखवायचं हे बंद झालं पाहिजे.

सध्या पदवीधर व शिक्षक मतदार संघाच्या निवडणुकीचा बिगुल वाजलेला असून निवडणूक अंतिम टप्प्यात आहे. संबंधित निवडणुकांसाठी मोठ्या प्रमाणावर प्रचार यंत्रणा उभी करण्यात आली असून मर्यादित मतदार असतानाही गावोगावच्या पुढार्‍यांना एकत्र आणून त्यांच्या माध्यमातून अनेक आमिष दाखवली जात आहेत. विशेष म्हणजे एकमेकांच्या विरोधात असलेले नेते मंडळी निवडणुकीच्या माध्यमातून एकत्र, एकमताने येताना दिसतात. पण लोकांच्या हितासाठी एखादी योजना हाणून पाडण्यासाठी किंवा बंद कारखाना सुरू करण्यासाठी एकत्र येताना दिसत नाहीत हे दुर्दैव आहे.

उजनी वरील जो प्रकल्प उभा राहत आहे त्या प्रकल्पाला तालुक्यातील तळागाळातील नेत्यापासून ते जिल्हा पातळीवरील नेत्यांनी सर्वांनीच विरोध केलेला दिसून आला आहे. परंतु हा विरोध केवळ शेतकऱ्यांना दाखवण्यासाठी तर नाही ना? असा प्रश्न सध्या उपस्थित होत आहे. कारण ज्या सरकारने ही योजना शेतकऱ्यांच्या माथी मारण्यासाठी आणलेली आहे त्याच सरकारच्या ताटाखालचे मांजर म्हणून बरेचसे नेते आपली भूमिका घेताना दिसून येत आहेत. त्यामुळे ज्या पद्धतीने आदिनाथ हातातून गेला व कोणीच काही करू शकले नाही त्याच पद्धतीने ही योजना सुरू झाली तरी केवळ विरोधासाठी भाषा बोलली जाईल व ही योजना शेतकऱ्यांच्या मुळावर येऊन बसेल अशी शक्यता आहे.

खरंच या पुढार्‍यांना शेतकऱ्यांचं व आंदोलनकर्त्यांचं देणं घेणं असतं तर सध्या सुरू असलेल्या निवडणुकांमध्ये उघडपणे सत्ताधारी गटाला पाठिंबा देण्याऐवजी आमच्या आंदोलनकर्त्यांचे मागण्या पूर्ण करा शेतकऱ्यांना न्याय द्या, जो प्रकल्प उभा केला जात आहे त्याचे फायदे तोटे सांगा व नंतरच निवडणुकांना सामोरे जा असे बोलण्याची धमक एकाही नेत्यात दिसून आलेले नाही हे विशेष आहे. त्यामुळे केवळ ” तू मारल्यागत कर व मी रडल्यागत करतो” अशी भूमिका सध्या घेतलेली दिसत असून सुज्ञ नागरिक आता यात फसणार नाही असे दिसून येत आहे.

error: परवानगी शिवाय बातमी कॉपी करू नये. हा कायद्याने गुन्हा आहे !
WP Radio
WP Radio
OFFLINE LIVE