चारा छावण्यां व डेपो ऐवजी शेतकऱ्यांच्या खात्यावर थेट अनुदान जमा करा! शिवसेना शिंदे गटाचे जिल्हाप्रमुख महेश चिवटे यांची मागणी
करमाळा समाचार

सध्या निर्माण झालेल्या दुष्काळी परिस्थितीमुळे आगामी काळात जनावरांच्या चारा आणि पिण्याच्या पाण्याचा प्रश्न गंभीर होण्याची शक्यता आहे. या पार्श्वभूमीवर प्रशासनाकडून चारा छावण्या व डेपो सुरू करण्याचे नियोजन केले जात असले, तरी चारा छावण्या सुरू करण्याऐवजी प्रत्येक पात्र शेतकऱ्याच्या खात्यावर थेट अनुदान जमा करावे, अशी मागणी शिवसेना शिंदे गटाचे जिल्हाप्रमुख महेश चिवटे यांनी केली आहे.

चारा छावण्यांवर मोठ्या प्रमाणात शासकीय निधी खर्च होतो. मात्र, प्रत्यक्षात या योजनांचा लाभ गरजू शेतकऱ्यांपर्यंत अपेक्षित स्वरूपात पोहोचतोच असे नाही. चारा छावण्यांच्या माध्यमातून मोठी आर्थिक उलाढाल होत असली, तरी अनेकदा शेतकऱ्यांच्या पदरी निराशाच पडते. अशा योजना भ्रष्टाचाराचे कुरण ठरण्याची शक्यता असल्याने प्रशासनाने या पारंपरिक पद्धतीचा पुनर्विचार करावा, असे चिवटे यांनी म्हटले आहे.
शेतकऱ्यांना त्यांच्या जनावरांसाठी स्वतःच्या सोयीनुसार चारा खरेदी करता यावा, तसेच पाण्याची व्यवस्था करता यावी, यासाठी अनुदानाची रक्कम थेट शेतकऱ्यांच्या बँक खात्यावर जमा करणे आवश्यक आहे. यामुळे शेतकऱ्यांना आर्थिक आधार मिळेल आणि शासकीय निधीचा लाभही थेट लाभार्थ्यांपर्यंत पोहोचेल.

त्यामुळे प्रशासनाने चारा छावण्या सुरू करण्याचा निर्णय घेण्याऐवजी पात्र शेतकऱ्यांच्या खात्यावर थेट अनुदान वर्ग करण्याची योजना राबवावी, अशी आग्रही मागणी महेश चिवटे यांनी केली आहे.


