करमाळासोलापूर जिल्हासोलापूर शहर

ए आय विरोधात शेतकरी आक्रमक पण काही नेत्यांचा गल्लीत गोंधळ दिल्लीत मुजरा

करमाळा समाचार 

सध्या अतिशय तीव्रतेने चर्चिले जाणाऱ्या विषयामध्ये सर्वात मोठा विषय म्हणजे ए आय डाटा सेंटर. त्याचे फायदे व तोटे, यामुळे शेतकरी तसेच सामान्य नागरिकांसह मच्छीमारांचे होणारे नुकसान मोठ्या धोक्याची घंटा असतानाही नेते मात्र राजकीय भूमिकेतून बाहेर पडलेले दिसत नाहीत. एकीकडे आंदोलनकर्त्यांसोबत आंदोलनात सहभागी होऊन सरकारविरोधी भाषणे करायची व आंदोलनाच्या बाहेर निघून सरकारचे लाळघोटेपणा करायचा अशा काही नेत्यांच्या धोरणामुळे शेतकऱ्यांना न्याय मिळेल का? हा प्रश्न उपस्थित होत आहे.

ज्या उजनीच्या पाण्यावर करमाळा तालुक्यासह परिसरातील तालुक्यांचा वाटा असतानाही त्यावर अनेक निर्बंध लावले जातात. परिसरातील अनेक जमीन क्षेत्र यात गेलेले असताना संपूर्ण उजनीपट्टा वगळता करमाळा तालुका हा दुष्काळग्रस्त असल्याचे दिसून येते. उजनी 100% भरलेली असताना तालुक्यातील 80 टक्के भाग हा यासाठी तहानलेला असतो ही वस्तुस्थिती आहे. अशा काळात पाहण्याचा तुटवडा निर्माण झाला तर पिण्याच्याही पाण्याची अडचण निर्माण होते हे लपून राहिलेलं नाही.

दुष्काळी परिस्थितीत तालुक्यातच पाणी मिळत नाही. इतर ठिकाणी पाणी कशा पद्धतीने पोहोचेल हा प्रश्न तर बाजूलाच राहिला. अशा वेळी उजनी पट्ट्यातील लोकांना हे पाणी वापरताना अनेक अडचणींचा सामना करावा लागतो. 100 टक्के उजनी धरण भरलेले असताना अनेक अडचणी येतात. तर जेव्हा ए आय डाटा सेंटर प्रकल्प या ठिकाणी तयार होत आहे त्यानंतर किती अडचणी येतील याचा विचार न केलेला बरा. तालुक्यातच उजनीच्या कडेला जर पाणी मिळू शकणार नसेल तर उजनी पासून जिथे पाणी जाते अशा भागातील लोकांनी पाण्याबाबत विचार न केलेलाच बरा अशी परिस्थिती निर्माण होण्याचा धोका यातून दिसत आहे.

अशी परिस्थिती असताना बऱ्याच नेते मंडळी उघडपणे संबंधित प्रकल्पाला विरोध केलेला दिसून आलेला असला तरी मोठ्या आंदोलनांमध्ये सहभागी होऊन शेतकऱ्यांसोबत असल्याचे दाखवत पुन्हा संबंधित पक्ष व सरकारची हुजरेगिरी करताना दिसून येत आहे. म्हणजेच गल्लीत गोंधळ आणि दिल्लीत मुजरा अशी काहीशी परिस्थिती झाल्याचे दिसून येत आहे. काहींनी सरकार विरोधात आंदोलनामध्ये आक्रमक भूमिका घेतली, पण त्याच सरकारच्या नेतेमंडळीची गाठीभेटी व हूजरेगिरी करण्यात त्यांना समाधान मिळत आहे. त्यामुळे शेतकऱ्यांचे काय? हा प्रश्न आहे.

शेतकरी व मच्छीमार केवळ यांच्यासाठीच संबंधित धोका नसून येणाऱ्या काळात शहरातील पाणीपुरवठ्यावरही याचा परिणाम होताना दिसणार आहे. जर जवळच्या तालुक्यातील शहरातील पाणीपुरवठ्यावर याचा परिणाम होत असेल तर सोलापूर, बार्शी यासारखे गावी सुद्धा यामुळे प्रभावित होऊ शकतात. परंतु त्या ठिकाणी उघडपणे संबंधित ए आय डेटा प्रकल्पाचे समर्थन होत असल्याने शेतकरी व नागरिकांमध्ये फूट पाडल्याचंही दिसून येत आहे. अशा परिस्थितीत नेत्यांच्या डामडोल भूमिकेमुळे शेतकऱ्यांसह सर्वांचेच नुकसान होताना दिसणार आह. त्यामुळे आत्ताच सावध व्हा.

जे लोक सध्या आम्ही तुमच्या सोबतच आहोत असे सरकारमधील मंत्री व नेत्यांची चाटूगिरी करण्याचे काम करीत आहेत अशांना ओळखा व त्यांना एकाच भूमिकेत राहण्याचे आवाहन करा. एकीकडे विरोध करायचा आणि दुसरीकडे त्याच नेत्यांचा झेंडा हातात घेऊन फिरायचा ही कोणती पद्धत म्हणायची? त्यामुळे शेतकऱ्यांना अंधारात न ठेवता उघडपणे मैदानात उतरून शेतकऱ्यांची बाजू मांडली तरच न्याय मिळेल शेतकऱ्यांनी ही अशा लोकांना वेळीच ओळखून बाजूला करणे गरजेचे आहे.

error: परवानगी शिवाय बातमी कॉपी करू नये. हा कायद्याने गुन्हा आहे !
WP Radio
WP Radio
OFFLINE LIVE