न्यायालयीन कर्मचाऱ्यांचा संप स्थगित; आजपासून राज्यातील सर्व कनिष्ठ न्यायालये नियमित सुरू
करमाळा समाचार

राज्यातील न्यायालयीन कर्मचाऱ्यांनी वेतनवाढीसह विविध प्रलंबित मागण्यांसाठी पुकारलेला राज्यव्यापी बेमुदत संप सकारात्मक चर्चेनंतर तात्पुरता स्थगित केला आहे. त्यामुळे आज, गुरुवार (दि. १९ नोव्हेंबर) पासून राज्यातील सर्व कनिष्ठ न्यायालयांचे कामकाज पूर्ववत सुरू होणार आहे.

महाराष्ट्र राज्य न्यायालयीन कर्मचारी महासंघ (गट-क), न्यायालयीन लघुलेखक संघटना, बेलिफ कर्मचारी महासंघ आणि गट-ड कर्मचारी महासंघ यांच्या वतीने १७ नोव्हेंबरपासून हा बेमुदत संप पुकारण्यात आला होता. या संपामुळे १७ व १८ नोव्हेंबर रोजी राज्यातील कनिष्ठ न्यायालयांचे कामकाज पूर्णपणे ठप्प झाले होते. परिणामी, न्यायालयीन कामकाजावर मोठा परिणाम झाला होता.
दरम्यान, मुंबई उच्च न्यायालयाच्या न्यायमूर्तींसोबत कर्मचारी संघटनांच्या प्रतिनिधींची ऑनलाइन बैठक झाली. या बैठकीत सकारात्मक चर्चा झाली. न्यायदानाची प्रक्रिया सुरळीत सुरू राहावी, यासाठी न्यायमूर्तींनी कर्मचाऱ्यांना संप स्थगित करण्याची विनंती केली.

तसेच, कर्मचाऱ्यांच्या वेतनवाढीच्या मागणीवर निर्णय घेण्यासाठी येत्या २६ नोव्हेंबर रोजी सकाळी ११.३० वाजता मुंबईतील मलबार हिल येथील सह्याद्री राज्य अतिथीगृहात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या अध्यक्षतेखाली बैठक आयोजित करण्यात आली आहे.
उच्च न्यायालयातील कर्मचाऱ्यांना २००६ पासून सुधारित वेतनश्रेणीचे लाभ मिळत असताना कनिष्ठ न्यायालयांतील कर्मचाऱ्यांना अद्याप हे लाभ मिळालेले नाहीत. याच प्रमुख मागणीसह इतर प्रलंबित प्रश्नांवर या बैठकीत निर्णय होण्याची अपेक्षा आहे.
मात्र, २६ नोव्हेंबरच्या बैठकीत मागण्यांवर समाधानकारक निर्णय न झाल्यास पुढील आंदोलनाबाबत योग्य तो निर्णय घेतला जाईल, असा इशाराही कर्मचारी संघटनांनी दिला आहे. सध्या संप स्थगित झाल्याने आजपासून न्यायालयीन कामकाज नियमित सुरू होणार असून, पक्षकार आणि वकिलांना दिलासा मिळणार आहे.


