शंभूराजे जगताप यांच्या बिनविरोध निवडीने करमाळ्यात जल्लोष!
करमाळा समाचार

सोलापूर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या निवडणुकीत करमाळा तालुक्यातील सोसायटी मतदारसंघातून युवा नेते तथा करमाळा कृषी उत्पन्न बाजार समितीचे माजी संचालक व खरेदी-विक्री संघाचे चेअरमन शंभूराजे जयवंतराव जगताप यांची बिनविरोध निवड झाली. या निवडीचा जगताप गटाच्या कार्यकर्त्यांनी करमाळा तालुक्यात उत्साहात जल्लोष साजरा केला. करमाळा शहरातील विविध ठिकाणी फटाक्यांची आतषबाजी करण्यात आली, तर गुलालाची उधळण करत कार्यकर्त्यांनी आनंदोत्सव साजरा केला.

सोसायटी मतदारसंघातील उमेदवार सुभाष गुळवे यांनी आपली उमेदवारी मागे घेतल्यानंतर शंभूराजे जगताप यांचा एकमेव अर्ज शिल्लक राहिला. त्यामुळे त्यांची बिनविरोध निवड जाहीर करण्यात आली.
बँकेचे माजी उपाध्यक्ष तथा माजी आमदार जयवंतराव जगताप यांचा उमेदवारी अर्ज नामंजूर झाल्यानंतर जगताप गटाच्या वतीने शंभूराजे जगताप यांची भाजपप्रणीत पॅनेलकडून उमेदवारी अंतिम करण्यात आली होती. अखेर त्यांच्या बिनविरोध निवडीने जगताप गटाला मोठे राजकीय यश मिळाले आहे.

विशेष म्हणजे, शंभूराजे जगताप यांच्या निवडीमुळे जगताप कुटुंबाच्या तिसऱ्या पिढीचे जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या राजकारणात पदार्पण झाले आहे. यापूर्वी कै. नामदेवराव जगताप यांनी बँकेचे चेअरमन व संचालक म्हणून, तर जयवंतराव जगताप यांनी उपाध्यक्ष व संचालक म्हणून प्रदीर्घ काळ कामकाज पाहिले आहे. आता शंभूराजे जगताप यांच्या रूपाने जगताप कुटुंबाची तिसरी पिढी बँकेच्या संचालक मंडळात दाखल झाली आहे. या निवडीमुळे करमाळ्याच्या सहकार क्षेत्रातील जगताप गटाचे राजकीय महत्त्व पुन्हा एकदा अधोरेखित झाले आहे.


