आदिनाथच्या माध्यमातून म्होरक्याला सुवर्णसंधी ; आदिनाथसाठी लढणारा ठरणार देवदुत
करमाळा समाचार – विशाल घोलप
श्री. आदिनाथ सहकारी साखर कारखाना अडचणीत आहे व पुढे सुरू होईल का नाही यातही साशंकता आहे. शासनाने किंवा निवडणूक जिंकलेल्या संचालक मंडळाने आपली ताकद दाखवली तर कारखाना पुन्हा एकदा योग्य पद्धतीने सुरू होऊ शकतो व कर्मचाऱ्यांसह शेतकऱ्यांचाही फायदा होईल. विशेष म्हणजे बंद असलेल्या कारखान्याला सत्ता मिळून बंदच राहिला तर त्याचे खापर कोणावरही फुटणार नाही. पण बंद कारखाना सुरू झाला तर त्या संचालक मंडळाची किंवा म्होरक्याची वाह वा झाल्याशिवाय राहणार नाही. त्यामुळे एक चांगली संधी स्वतःहून चालून आली आहे.

तालुक्याच्या राजकारणात प्रमुख स्पर्धक असलेले बागल व जगताप यांनी आदिनाथ सहकारी साखर कारखान्याच्या निवडणुकी मधून माघार घेण्याचा निर्णय घेतला आहे. दोघांचाही निर्णय कोणत्या कारणामुळे झाला या संदर्भात दबक्या आवाजात वेगवेगळ्या चर्चा सुरू आहे. पण सध्या कारखाना बंद असल्याने इथून पुढे बंद ही राहिला तर त्याचे खापर कोणावरही फुटणार नाही असे दिसून येते. पण सध्या कारखाना सुरू होणे गरजेचे असून आणि सुरु करुन दाखवण्याची तयारी दाखवणाऱ्या म्होरक्या सध्या गरजेचा असल्याचे बोलले जात आहे.

सध्याच्या परिस्थितीमध्ये आमदार नारायण पाटील, माजी आमदार संजयमामा शिंदे व प्रा. रामदास झोळ यांच्यासह महेश चिवटे व इतर मातब्बर अजूनही मैदानात ठामपणे उभा आहेत. त्यामुळे काही प्रमाणात कारखाना सुस्थितीत येण्याच्या अशा जिवंतही आहेत. उर्वरित सभासदांना एकत्र करीत कारखाना अविरोध करण्याच्या आशा सध्यातरी मावळलेल्या दिसून येत आहेत. पण तालुक्याच्या राजकारणात महत्त्वाच्या मोठ्या गटांनी सहभाग नोंदवल्याने येणाऱ्या काळात कारखान्याला अच्छे दिन येतील हे मानले जात आहे. अशा परिस्थितीत कारखाना पुन्हा चालू झाला नाही तरी सत्तेत आलेल्या म्होरक्या व संचालकांना कोण नाव तरी ठेवणार नाही अशी परिस्थिती आहे. पण त्यांनी धाडस दाखवलं याचं कौतुक ही निश्चित होणार आहे.
कारखाना मागील दहा वर्षांपासून बंद आहे. रडत पडत मधून अधून चालू होऊन त्याच्यात अधिकच नुकसान झालेले दिसून आले आहे. कर्मचाऱ्यांच्या थकीत पगारी हा मोठा चर्चेचा विषय आहे. तर कारखाना भाडेतत्त्वावर का सहकारी तत्त्वावर चालवावा यात मतमतांतरे आहेत. पण सर्वात महत्त्वाचे कारखाना चालू होऊन पहिली पगार हातात येणे हा महत्त्वाचा विषय आहे. तसे झाल्यास कर्मचारी व शेतकरी यांच्यासाठी प्रयत्न करणार एक प्रकारे देवदूत असू शकतो. त्यामुळे सध्या तरी कारखाना निवडणुकीत जो सत्तेत येईल त्याच्यावर खापर फुटण्याची शक्यता नसून उलट कारखाना चालू झाल्यास संचालक मंडळाचे नेतृत्व करणाऱ्या म्होरक्याला नक्कीच उभारी आल्याचे दिसून येईल.