कोरोना कंट्रोल मध्ये आणण्यास नव्या मोहिमेचा आजपासून प्रारंभ
प्रतिनिधी- करमाळा समाचार
कोविड-19 च्या नियंत्रणासाठी तसेच मृत्यू दर कमी करण्यासाठी ‘माझे कुटूंब माझी जबाबदारी’ कोविड मुक्त महाराष्ट्र या मोहिमेस आजपासून करमाळा तालूक्यात प्रारंभ करण्यात आलेला आहे. महाराष्ट्र शासनाच्या निर्णयानुसार व जिल्हाधिकारी सोलापूर यांचे निर्देशानुसार ही मोहिम राबविण्यात येत आहे.


सदरची मोहिम ही ग्रामीण भागामध्ये गटविकास अधिकारी व तालूका आरोग्य अधिकारी तर शहरी भागात मुख्याधिकारी व वैद्यकीय अधीक्षक यांचे समन्वय व नियंत्रणाखाली राबविण्यात येत आहे. या मोहिमेनुसार तालूक्यातील सर्व घरांना व कुटुंबाना विवीध पथकाच्या सहाय्याने भेटी देण्यात येणार आहेत.
या मध्ये कोविड रोगाचे अनुषंगाने तालूक्यातील प्रत्येक नागरिकांची तपासणी करून आरोग्य शिक्षण देण्यात येणार असून ताप असणारे ,को-माॅर्बिड,कोविड संशयित रूग्णांची तपासणी करून त्यांना आवश्यक ते औषधोपचार करण्यात येणार आहेत. याद्वारे तपासणी,चाचणी व उपचार या सेवा देण्यात येणार आहेत.
या मोहिमेच्या प्रभावी अंमलबजावणीकरिता तपासणी पथकामध्ये लोकप्रतिनिधी ,खाजगी रूग्णालय,स्वंयसेवी संस्था सदस्य यांना सहभागी करून घेण्यात येणार आहे.
‘माझे कुटूंब माझी जबाबदारी’ ही मोहिम करमाळा शहर व तालूक्यात यशस्वी राबविण्यासाठी तहसीलदार समीर माने यांचेसह गटविकास अधिकारी श्रीकांत खरात,मुख्याधिकारी वीणा पवार,तालूका आरोग्य अधिकारी सागर गायकवाड,उपजिल्हा रूग्णालय अधिक्षक अमोल डुकरे विशेष परिश्रम घेत आहेत.
माझे कुटूंब माझी जबाबदारी’ही मोहिम कोविड-19 च्या नियंत्रणासाठी महत्वाची मोहिम आहे. यामध्ये या आजाराचा प्रसार होवू नये म्हणून तपासणी चाचणी उपचारासह शास्त्रशूद्द माहिती देणे हा उद्देश आहे.सर्व नागरिकांनी प्रशासनास सहकार्य करावे व जास्तीत जास्त तपासण्या करून घ्याव्यात.
– समीर माने ,
तहसिलदार करमाळा