डिकसळ पुलाचा काही भाग कोसळला ; वाहतुक पुर्ण बंद
करमाळा समाचार (karmala samachar)
सोलापूर पुणे जिल्ह्याला जोडणारा महत्त्वपूर्ण असा डिकसळ(dikasal) पुल धोकादायक बनला असून त्याचा काही भाग काल कोसळला आहे. त्यामुळे प्रशासनाच्या वतीने त्यावरील संपूर्ण वाहतूक बंद करण्याचा निर्णय घेतला आहे. त्या रस्त्यावर जाण्यासाठी जड वाहन, कारने तर नकोच दुचाकीनेही प्रवास करू नये असे आवाहन बांधकाम विभागाचे अभियंता श्री उबाळे यांनी केले आहे.(karmala- pune)

ब्रिटिश कालीन पुल हा बऱ्याच काळापासून धोकादायक बनला होता. यामुळे प्रशासनाच्या वतीने दोन वेळा त्यावर जड वाहतुकीस बंदी घातली होती. परंतु ऊस वाहतूक करणाऱ्या ट्रॅक्टर चालक व कारखानदारांच्या कार्यकर्त्यांनी सदरचे बॅरिगेटींग तोडून पाण्यात टाकून दिले होते. त्यामुळे जड वाहतूक त्यावरून सुरूच होती.

मागील पावसाळ्यात मोठ्या प्रमाणात पाणी आल्याने डिकसळ पुलाच्या उंची इतके पाणी पुलावर होते. पुलावर उभा राहून हाताला येईल इतके पाणी होते. त्यामुळे लवकर पडझड झाल्याचे दिसून येते अशीच वाहतूक यावरून होत राहिली तर कधीही कोणत्याही गाडीचा अपघात होऊ शकतो. त्यामुळे त्यावरून जाण्यासाठी सर्वच वाहनांना बंदी घातल्याचा निर्णय प्रशासनाने घेतला आहे. तरी करमाळा परिसरातून जाणाऱ्या वाहतुकीने राशीन मार्गे जावे अन्यथा जिंती भागातून पर्याय उपलब्ध आहेत.
जिंती – बाभळगाव – शिंपुरा – करपडी फाटा – खेड – खानोटा – डिकसळ असा मार्ग आहे. पण शक्यतो कोर्टी भागातुन जाणाऱ्या लोकांनी राशीनला जाण्याला प्राधान्य द्यावे.