उजनीच्या पात्रात थेट आकाशातुन धार ; नेमके काय घडले सपुर्ण माहीती
करमाळा समाचार
तालुक्यातील सांगवी बिटरगाव परिसरात दुपारी मुले क्रिकेट खेळत असताना अचानक त्यांना पाण्यामध्ये पावसाचे पाणी थेट ढगातून पडताना दिसत होते. त्याची रुंदी जवळपास पाच ते दहा फूट असावी असा अंदाज मुलांनी व्यक्त केला. तर थेट आकाशातून धार पाण्यात पडत असताना मुलांनी पाहिल्याने आश्चर्य व्यक्त केले. सदरचे सर्व दृश्य बसळे वस्ती परिसरातील सुरज पाचवे या मुलाने आपल्या मोबाईल मध्ये टिपले व संपूर्ण हा व्हिडिओ सर्वत्र पोहोचल्यानंतर चर्चेचा विषय ठरत आहे. दोन ते पाच मिनिटांसाठी सदरची ही धार ढगफुटी सदृश्य दिसून येत होती.

मागील काही दिवसांपासून सतत पाऊस सुरू आहे. यावेळी काही काळ पाऊस थांबल्यानंतर मुलांनी रविवारच्या दिवशी क्रिकेट खेळणे पसंत केले. बसळे वस्ती वरील मुले क्रिकेट खेळण्याच्या निमित्ताने उजनी जलाशयाच्या मोकळ्या मैदानात गेले होते. यावेळी दहा ते पंधरा मुले त्या ठिकाणी क्रिकेट खेळत असताना अचानक पाण्यात एक मोठी धार सुरू असल्याचे दिसून आले.

यावेळी सदरची धार हे ढगफुटी सदृश्य असल्याचे मुलांच्या लक्षात आल्यानंतर त्यांनी सदर चित्रण हे मोबाईलच्या कॅमेऱ्यामध्ये केली. दुपारी तीन च्या सुमारास सुरू असलेली ही धार तीन ते चार मिनिट सुरू असल्याचे सदरच्या मुलांनी सांगितले. यावेळी इतर ढग जेव्हा एकत्र आले. त्यावेळी त्या ढगांमध्ये ती धार मिसळली व पुन्हा पावसाला सुरुवात झाली. सर्व ढग एकत्र आल्यानंतर त्याचे रूपांतर पावसात झाल्याने एक धार सुरू होती ती धार बंद होऊन पाऊस सुरू झाला.
आम्ही रविवारचा दिवस असल्यामुळे क्रिकेट खेळण्यासाठी गेलो होतो. यावेळी अचानक मुलांचे लक्ष पाण्याच्या दिशेने गेले. आमच्याकडे मोबाईल होता आम्ही मोबाईल मध्ये चित्रण केले. एक असा प्रकार पहिल्यांदाच बघायला मिळाला आम्हालाही आश्चर्य वाटत होते. त्यामुळे सर्वांनी आश्चर्याने व्हिडिओ काढले व सर्वत्र पसरल्यानंतर त्याची चर्चा सुरू झाली. परिसरात दोन ते पाच मिनिटांपर्यंत सदरची धार सुरू होती. त्यामुळे ढगफुटी सदृश्य प्रकार असावा असा आम्हाला वाटलं.
– सुरज पाचवे, बिटरगाव.