कारखान्यामुळे मंदिराला धोका ? लोकांचा कारखान्याबाबत संताप
करमाळा समाचार – नाना घोलप
रात्रीच्या वेळी अचानक झालेल्या आवाजामुळे करमाळा शहर तसेच आजूबाजूच्या गावांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले होते. सदरचा आवाज हा कमलाई कारखान्यावरील मशिनरीचा असल्याचे समजल्यानंतर घबराट थोडीशी कमी झाली. पण संबंधित कारखाना हा लोकवस्ती पासून जवळ असून त्याशिवाय पुरातन काळातील कमला भवानी मंदिराच्या शेजारी आहे. याच्या अशा प्रकारच्या धमाके व घाणीमुळे मंदिराचे सौंदर्य खराब तर होतेच आहे. शिवाय मंदिराचा ढाचा कमकुवत झाल्याशिवाय राहणार नाही अशा प्रतिक्रिया सध्या लोकांमधून उमटत आहेत.

करमाळा शहरापासून अवघ्या दोन किलोमीटर अंतरावर व कमला भवानी मंदिरापासून केवळ 200 मीटर अंतरावर असलेला हा कारखाना सध्या नागरिक व मंदिर या दोघांसाठी घातक झालेला दिसून येत आहे. सदरच्या कारखान्याची परवानगी ही पांडे हद्दीत असतानाही याचा जास्त त्रास हा मंदिर परिसर व शहरातील लोकांना अधिक होताना दिसत आहे. युद्धजन्य परिस्थिती वेळी ज्या पद्धतीने विमान हवेतून उडून जात असताना जो आवाज होतो त्या पद्धतीचा आवाज मध्यरात्री अचानक सुरू झाल्याने लहान मुले तसेच घरात शांतपणे झोपून असलेल्या नागरिकांना धास्तावून गेला.

या आवाजा शिवाय त्यानंतर या कारखान्यामुळे पाण्याच्या माध्यमातून होणारी घाण व हवेतून होणारे प्रदूषण हे तर सुरूच असते. त्याचा त्रास कमलाभवानी मंदिरासह शहरातील सर्वच भागात होताना दिसत येतो. सदरच्या कारखान्याच्या घाण वासामुळे त्या परिसरातील जमिनींचे भावही कमी झाले आहेत. लोक आता त्या भागात राहण्यासाठी पसंती देत नसून त्यांनी पुणे रस्त्याला आपला रहिवास वाढवलेला आहे. कारखान्यामुळे या भागांमध्ये राहणीमानावर परिणाम झालेला दिसून येत आहे.
मंदिर परिसरात असलेल्या या कारखान्यामुळे लोकांना वेगवेगळ्या त्रासाला सामोरे जावे लागत आहे. शिवाय कारखाना सुरू असताना याच्यापासून होणारा व्हायब्रेशन व कर्णकरकर्षक आवाज पुरातन काळातील मंदिरालाही याचा धोका उद्भवू शकतो. नुकतेच या ठिकाणी रंगकाम काढण्याचे काम सुरू आहे. मंदिर परिसरात तीन डिकमली आहेत या व्हायब्रेशन मुळे यांनाही धोका निर्माण होईल अशी शक्यता व्यक्त केली जात आहे. रात्री झालेल्या आवाजानंतर शहरातील व परिसरातील नागरिकांकडून संबंधित कारखान्याबाबत उलट सुलट चर्चा सुरू आहेत. प्रशासनाने याकडे त्वरित लक्ष देऊन पुरातन काळातील मंदिर व लोक नागरिकांचा आरोग्याची काळजी घेणे गरजेचे आहे.