करमाळासोलापूर जिल्हा

राजुरी च्या आखाड्यात आमदार संजय मामांची हजेरी , तर मा. आमदार नारायण आबा ‘पंच’

करमाळा समाचार -संजय साखरे


करमाळा तालुक्यातील राजुरी येथील ग्रामदैवत श्री बाळनाथ स्वामी महाराजांची यात्रा अक्षय तृतीया ला मोठ्या उत्साहात पार पडली. यात्रेच्या दुसऱ्या दिवशी झालेल्या कुस्तीच्या आखाड्यात आमदार संजय मामा शिंदे यांनी हजेरी लावली तर शेवटच्या कुस्तीसाठी माजी आमदार नारायण आबा पाटील यांनी पंच म्हणून काम पाहिले.

यात्रे दिवशी आंबील, शेरनी या धार्मिक विधीनंतर रात्री बारा वाजता बाळनाथाच्या छबिन्याची सवाद्य मिरवणूक निघाली. पारंपारिक लेझीम व ताशा यासह आधुनिक डीजे या वाद्यांचा यामध्ये समावेश होता. गावातील सर्व आबाल वृद्धांनी या यात्रेमध्ये सहभागी होऊन यात्रेचा आनंद लुटला.

यात्रेच्या दुसऱ्या दिवशी हजेरीचा कार्यक्रम पार पडल्यानंतर दुपारी चार वाजता निकाली कुस्त्यांचे जंगी मैदान भरण्यात आले होते. या कुस्ती मैदानासाठी बारामती, इंदापूर, भिगवन, नगर, राशीन, अकलूज, टेंभुर्णी, कर्जत, इंदापूर या सह करमाळा तालुक्याच्या विविध गावातील नामांकित मल्लांनी हजेरी लावली होती. यामध्ये अनेक नामांकित पैलवानांच्या कुस्त्या जोडण्यात आल्या होत्या. निकाली कुस्त्यांनी कुस्ती शौकिनांच्या डोळ्यांचे पारणे फेडले.

या कुस्ती आखाड्यामध्ये शेवटची कुस्ती कोल्हापूरच्या गंगावेस तालमीचा मल्ल, मुंबई महापौर केसरी व महान भारत केसरी माऊली जमदाडे विरुद्ध निरावागज बारामतीचा मल्ल भारत मदने यांच्यात झाली. या कुस्तीसाठी इनाम रक्कम एक लाख रुपये व बाळनाथ केसरी हा किताब आणि चांदीची गदा ठेवण्यात आली होती.

दोन्ही पैलवानांनी कुस्ती निकाली होण्यासाठी प्रयत्नांची शर्थ केली पण शेवटी या दोघांमधील कुस्ती अनिर्णित अवस्थेत संपली. या कुस्तीची इनाम रक्कम दोन्ही मल्लांना विभागून देण्यात आली. शेवटच्या कुस्तीसाठी करमाळा तालुक्याचे माजी आमदार नारायण आबा पाटील यांनी पंच म्हणून काम पाहिले .या कुस्ती मैदानासाठी राजुरी येथील उद्योजक मनोज शेठ सोळंकी यांनी 75 हजार रुपयांची देणगी दिली होती. या कुस्ती मैदानाचे सूत्रसंचालन प्रख्यात कुस्ती निवेदक धनंजय मदने यांनी केले.

DMCA.com Protection Status
error: परवानगी शिवाय बातमी कॉपी करू नये. हा कायद्याने गुन्हा आहे !
WP Radio
WP Radio
OFFLINE LIVE