अभयदादा जगताप प्रीमियर लीगचा शिवक्रांती विजेता ; अमोल कासार मालिकावीर
करमाळा समाचार
शरद क्रीडा महोत्सव अंतर्गत अभय दादा जगताप प्रीमियर लीग या स्पर्धेत बोरगाव संघाचा एकतर्फी पराभव करत शिवक्रांती स्पोर्ट क्लबने अंतिम सामन्यात एक लाखांचे पारितोषिकासाठी विजय मिळवला आहे. सदरच्या स्पर्धा गाव तसेच तालुका संघा दरम्यान खेळवण्यात आल्या होत्या. या मालिकेत २४ संघानी सहभाग नोंदवला. यामध्ये दहिगाव व शिवक्रांती यांच्यातील उपांत्य फेरीतील सामना रोमांचक ठरला यावेळी अभयसिंह जगताप, विद्याविकास मंडळाचे सचिव विलासराव घुमरे, राष्ट्रवादीचे तालुकाध्यक्ष संतोष वारे यांच्यासह विविध पक्षाचे पदाधिकारी उपस्थित होते.

राष्ट्रवादीचे नेते अभयसिंह जगताप यांच्या मार्गदर्शनाखाली भरवण्यात आलेल्या पाच दिवसीय सामन्यात अंतिम सामना हा प्रकाश झोतात खेळवण्यात आला. यावेळी बऱ्याच दिवसानंतर रात्रीचे सामने होत असल्याने प्रेक्षकांमध्ये नवा उत्साह होता. तर गाव पद्धतीच्या संघातून बोरगाव विरुद्ध केम व तालुका पद्धती मधून शिवक्रांतीविरुद्ध दहिगाव असे उपांत्य फेरीतील सामने झाले. यामध्ये बोरगाव ने केम चा तर शिवक्रांतीने दहिगाव चा पराभव करीत अंतिम फेरी गाठली.

अंतिम सामना बोरगाव विरुद्ध शिवक्रांती असा खेळण्यात आला. त्यामध्ये शिवक्रांती संघाच्या सुरज गुप्ता ३३ (१२), विलास दाहितोंडे २७(८), मिलिंद दामोदरे २८(६) यांच्या खेळीच्या जोरावर पाच बाद १२६ पर्यत मजल मारली. तर स्पर्धक संघ केवळ ६८ धावांपर्यत पोहचु शकला. यास्पर्धेत शिवक्रांती प्रथम, बोरगाव द्वितीय, दहिगाव तृतीय, केम चतुर्थ तसेच उंदरगाव व पोथरे यांना प्रत्येकी १० हजाराचे उत्तेजनार्थ पारितोषिक देण्यात आले. स्पर्धेत मालिकावीर म्हणुन अमोल कासार, सामनावीर मिलिंद दामोदरे (शिवक्रांती), उत्कृष्ट गोलंदाज सचिन निंबाळकर (दहिगाव) व उत्कृष्ट फलंदाज म्हणून अनिकेत नगरे यांना गौरवण्यात आले. या क्रिकेट स्पर्धांचे आयोजन शिवक्रांती स्पोर्टकडुन करण्यात आले होते.
स्पर्धेत आनंद भांगे व नितीन चोपडे यांनी सुत्र संचालन केले. स्पर्धा यशस्वी करण्यासाठी विनय ननवरे, सतिष फंड, भारत जगताप, अमर शिंगाडे, अझर जमादार, उमेश फंड, शशिकांत देहटे, विश्वजीत परदेशी यांच्यासह शिवक्रांती संघाच्या खेळाडुंनी प्रयत्न केले.
डान्सिंग अंपायर व प्रकाशझोतातील सामने प्रमुख आकर्षण…
अंतिम सामन्यांसाठी सर्व सामने हे प्रकाश झोतात खेळवण्यात आले. मागील चार ते पाच वर्षानंतर सदरचे सामने प्रकाश झोतात होत असल्याने व ग्रामीण भागातील संघ या सामन्यांच्या अंतिम फेरीपर्यंत पोहोचल्याने मोठ्या प्रमाणावर गर्दी पाहायला मिळत होती. तर डान्स करून निर्णय देणारा पंच म्हणून ओळख असलेला सोन्या बापू यांच्या डान्स मुळे प्रेक्षकांचे मनोरंजन झाले. तर खेळाडूंच्या उत्कृष्ट खेळीने बक्षीसांची लय लूट पाहायला मिळाली.