जुगार खेळताना पन्नाशी पार केलेल्या तीघांवर कारवाई ; 1020 रुपयांचा भलामोठा मुद्देमाल जप्त
करमाळा समाचार

तालुक्यातील आळजापूर परिसरात जुगार खेळत असताना आळजापूर येथील चौघांना करमाळा पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. त्यांच्याकडून एक हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. तर संबंधितांवर करमाळा पोलीस ठाण्यात गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. सदरची कारवाई दिनांक 3 रोजी दुपारी अडीचच्या सुमारास करण्यात आली आहे. यामध्ये साधारण पन्नास वर्षाच्या पुढील तिघांना तर एक चाळीस वर्षांच्या व्यक्तीस ताब्यात घेण्यात आले आहे.

करमाळा पोलीस ठाणे हद्दीत सदरचा छापा टाकून या छाप्यात एक हजार वीस रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. याशिवाय त्या ठिकाणी एक निळा शाईचा पेन व 52 पत्त्याचा डाव आणि एका निळ्या शाईने लिहिलेला कागद त्यावर आकडेमोड केलेली होती असा मोठा पुरावा हाती लागला आहे. सदरच्या कारवाईत चार व्यक्ती व हजार रुपयांचा मुद्दामाल जप्त केला आहे. त्यामध्ये एकाचे वय 62 वर्ष असून सदरची कारवाई खरंच धडाकेबाज होती का हा प्रश्न उपस्थित केला जात आहे.
सध्या तरी करमाळ्यात असेच छाटछुट जुगार खेळणारे मिळून येत असल्याचे दिसत आहे. याचा अर्थ तालुक्यात अवैधरीत्या चालवणे जाणारे जुगार अड्डे सध्या तरी बंद असावेत असा निष्कर्ष काढण्यात येत आहे. सदरच्या कारवाईमध्ये एक हजार रुपया इतका भला मोठा मुद्देमाल हाती लागल्याने याचेही कौतुक झालेच पाहिजे. याशिवाय येणाऱ्या काळात शहर व तालुक्यातील जुगार अड्डे चालू असतील तर बंद होतील व बंद असतील तर पुन्हा सुरू होणार नाहीत याची काळजी ही पोलिस यंत्रणा घेईल ही अपेक्षा आहे.


