करमाळासोलापूर जिल्हासोलापूर शहर

आदिनाथ निवडणूक- दिग्गजांच्या उमेदवारीने निवडणुकीत रंगत ; ‘ ती’ अट शिथिल होण्याची शक्यता

करमाळा समाचार

श्री. आदिनाथ सहकारी साखर कारखाना बंद असला तरी त्याच्या निवडणुकीत मात्र चुरस निर्माण झाली आहे. २१ जागांसाठी तब्बल २७२ अर्ज दाखल झाल्याने एक नवा विक्रम या ठिकाणी पाहायला मिळाला आहे. शुक्रवार पर्यंत केवळ ३० अर्ज दाखल झालेले असताना अखेरच्या दिवशी तब्बल २४२ अर्ज दाखल झालेले दिसून आले. सदरच्या निवडणुकीत मातब्बर स्वतः मैदानात उतरल्याने निवडणुकीला रंगत आल्याचे दिसून येत आहे. त्यामध्ये दोन्ही माजी आमदार तर विद्यमान आमदारांची सहभाग दिसून येत आहे.

तालुक्याच्या अस्मितेचा विषय असलेला श्री आदिनाथ सहकारी साखर कारखाना मागील दहा वर्षांपासून अतिशय अडचणीत असल्याचा आपल्याला दिसून आलेला आहे. यानिवडणुकीच्या अनुषंगाने मुदत संपल्यानंतर तब्बल चार वर्षांनी पुन्हा एकदा निवडणूक जाहीर झाली व बंद पडलेल्या कारखान्यासाठी उमेदवारांची झुंबड उडालेली दिसून आली. सदरचा कारखान्याची निवडणूक अविरोध होईल अशा चर्चा रंगत असताना आता मात्र तब्बल २७२ अर्ज दाखल झाल्याने सभासदांमध्ये निवडणुकीबाबत असलेला उत्साह दिसून येत आहे.

politics

सदरच्या निवडणुकीमध्ये बागल गटाच्या वतीने बागल कुटुंबीयांमधून एकही अर्ज दाखल न झाल्याने आश्चर्य व्यक्त करण्यात येत आहे. तर या निवडणुकीत माजी आमदार जयवंतराव जगताप, संजयमामा शिंदे यांच्यासह विद्यमान आमदार नारायण पाटील यांनीही उमेदवारी अर्ज भरले आहेत. यामुळे सदर निवडणुकीत वेगळी चुरस दिसून येत आहे. याशिवाय भाजपाचे गणेश चिवटे व झोळ गटाचे रामदास झोळ आणि शेतकरी संघटनेचे दशरथ कांबळे यांच्यासह सहकाऱ्यांनी उमेदवारी अर्ज भरले आहेत. त्यामुळे सुरुवातीलाच अविरोध निवडणूक होण्याची चिन्हे धुसर झालेली असताना मोठ्या प्रमाणावर दाखल झालेल्या अर्जांमुळे निवडणूक होणारच असल्याचे दिसून येत आहे.

शिंदे गटाकडुन – माजी आमदार संजयमामा शिंदे, माजी अध्यक्ष संतोष पाटील, सुजित बागल, चद्रकांत सरडे, चंद्रहास निमगिरे, सुहास गलांडे आदिसह सहकाऱ्यांनी अर्ज दाखल केले आहेत.

बागल गटाकडुन – माजी अध्यक्ष धनंजय डोंगरे, माजी उपाध्यक्ष रमेश कांबळे , बाजार समीती माजी उपसभापती चिंतामणी जगताप आदिनी अर्ज दाखल केले आहेत.

पाटील व जगताप गटाकडुन – माजी आमदार जयवंतराव जगताप, आमदार नारायण पाटील, संतोष वारे, धुळाभाऊ कोकऱे, देवानंद बागल, सुनिल सावंत, राहुल सावंत यांनी अर्ज दाखल केले आहेत.

तर रामदार झोळ यांच्या गटातुन स्वतः प्रा. रामदास झोळ, दशरथ कांबळे, रविंद्र गोडगे तर भाजपाकडुन गणेश चिवटे व शशिकांत पवार यांनी अर्ज दाखल केला आहे.

‘ती’ अट शिथील होणार ..
कारखाना बंद परिस्थितीत असल्यामुळे उमेदवारीसाठी लागणारी ऊसाची अट ही शिथिल होण्याची शक्यता असल्याचे दिसून येत आहे. त्यामुळे कारखान्याच्या निवडणुकीमध्ये उसाच्या अटीवरून अर्ज बाद होण्याची शक्यता कमी झाली आहे. त्यामुळे एक प्रकारे इच्छुकांना याचा दिलासा मिळताना दिसत आहे. अन्यथा नियमाप्रमाणे उसाची अट घातली असती तर बऱ्यापैकी अर्ज हे बाद झाले असते. त्यामुळे निवडणूक प्रक्रिया पार पाडणे अवघड होऊन बसले असते. सदरची अट शिथिल केल्यामुळे दिलासा मिळताना दिसत आहे. या सर्व अर्जांवर आज मंगळवारी छाननी होणार आहे.

DMCA.com Protection Status
error: परवानगी शिवाय बातमी कॉपी करू नये. हा कायद्याने गुन्हा आहे !
WP Radio
WP Radio
OFFLINE LIVE