दहा वर्षानंतर पुन्हा निवडणुकांचे बिगुल – सुरुवातीला दोन वर्षात सहा लाखांचे गाळप पोहचले पाच हजारावर
करमाळा – विशाल घोलप
२०१९-२० पासून बंद असलेल्या कारखान्यावर एकदा भाडेतत्त्वाचा निर्णय तर दोनदा प्रशासकीय सदस्यांच्या नियुक्ती करूनही अडचणीत असलेला कारखाना बाहेर काढू न शकल्याने, अखेर सदरच्या कारखान्यावर निवडणुका घेण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. सदरच्या कारखान्याची संचालकांचा कार्यकाल चार वर्षापुर्वी संपलेला आहे. त्यानंतर सदरची निवडणूक जाहीर होत आहे. त्यामुळे कर्जाचा डोंगर असलेल्या या कारखान्याच्या निवडणुकीकडे अनेकांचे लक्ष लागून राहिले आहे.

२०१७-१८ मध्ये निवडणुका झाल्या आणि बागल गटाने विजय मिळवत सदरच्या कारखान्यावर संतोष पाटील यांची अध्यक्षपदी नेमणूक केली. यावेळी सुरुवातीला तीन लाख ७६ हजार गाळप करण्यात संतोष पाटील यांना यश आले होते. तर पुढच्याच वर्षी पुन्हा एकदा अडीच लाखापर्यंत गाळप पाटील यांनी करून दाखवले. त्यानंतर मात्र २०१९-२० मध्ये संतोष पाटील यांना पायउतार व्हावे लागले व त्यांच्या जागी बागल गटाकडून धनंजय डोंगरे यांची अध्यक्षपदी नियुक्ती केली. दरम्यान संचालक फुटाफुटीही बघायला मिळली.

२०१९-२० पासून कारखाना सलग तीन वर्ष बंद राहिला. त्यामुळे पुन्हा एकदा कारखाना अडचणीत आला. त्यादरम्यान कारखान्यावर असलेल्या संचालक मंडळाने सदरचा कारखाना हा भाडेतत्त्वावर देण्याचा निर्णय घेतला. पण बँका तसेच इतर अडचणींमुळे सदर कारखाना भाडेतत्त्वावर जाण्याअगोदरच तालुक्यातील कारखाना बचाव समितीने हस्तक्षेप केला शिवाय कारखान्याच्या संचालकांनीही विरोध दर्शवला त्यामध्ये माजी मंत्री तानाजी सावंत यांच्यासह तालुक्यातील विविध गटातटाच्या नेत्यांनी सहभाग नोंदवला व कारखाना भाडेतत्त्वावर देण्यास विरोध केला.
त्यानंतर डोंगरे यांच्या कार्यकाळात २०२२-२३ मध्ये ७६ हजाराचे गाळ करता आले. पण त्यानंतर कारखान्यावर प्रशासकाची नियुक्ती झाली व महेश चिवटे व संजय गुटाळ यांच्यासह प्रशासकीय अधिकारी बेंद्रे यांना प्रशासकीय संचालक म्हणून नेमण्यात आले. परंतु केवळ ५ हजारच गाळप होऊ शकले. त्यामुळे कारखान्याला अधिकचा आर्थिक भुरदंड सोसावा लागला. त्यानंतर मात्र आज तागायत कारखाना बंद आहे.
चिवटे व गुटाळ यांचा कार्यकाल संपल्यानंतर त्यावर पुन्हा एकदा नव्या संचालक मंडळाची नियुक्ती करण्यात आली. त्यामध्ये विलासराव घुमरे व ॲड. दीपक देशमुख यांची नियुक्ती केली. परंतु तेव्हापासून आज तागायत कोणत्याही प्रकारची प्रगती दिसून आली नाही. सध्या कारखान्यावर कर्जाचा डोंगर असून कामगारांची देणे थकीत आहेत. आता पुन्हा एकदा निवडणुकांचे बिगुल वाजले आहे. त्यामुळे या निवडणुकीकडे लक्ष लागून राहील.
२१ जागांसाठी १७ ला मतदान…
आदिनाथ सहकारी साखर कारखान्याची निवडणूक जाहीर झाली असून २१ जागांसाठी १० मार्च ते १७ मार्च अर्ज स्वीकारले जाणार आहेत. तर १८ मार्चला छाननी झाल्यानंतर १९ मार्च ते २ एप्रिल पर्यंत माघार घेण्याची मुदत आहे. त्यानंतर १७ तारखेला मतदान होऊन १९ एप्रिल रोजी मतमोजणीला सुरुवात होईल. सदरच्या कारखान्यात व्यक्ती उत्पादक सभासद म्हणून जेऊर, सालसे, पोमलवाडी, केम, रावगाव गटांमध्ये प्रत्येकी तीन असे १५ सदस्य तर उत्पादक सहकारी संस्था, अनुसूचित जाती जमाती, इतर मागास व भटक्या जाती जमाती यामध्ये प्रत्येकी एक तसेच राखीव महिला दोन सदस्य जागा अशा एकूण २१ जागांसाठी निवडणूक होणार आहे.