खंडीत वीज पुरवठ्याला कंटाळुन शेतकऱ्यांचा आक्रमक पवित्रा
करमाळा समाचार -संजय साखरे
कोर्टी तालुका करमाळा येथील वीज उप केंद्रातून गेल्या आठ दिवसापासून खंडित वीज पुरवठ्यामुळे परिसरातील शेतकरी पूर्णपणे हतबल झाला असून आज सकाळी कोर्टी चे सरपंच निलेश कुटे यांच्यासह परिसरातील शेतकऱ्यांनी वीज उपकेंद्रा वर जाऊन ते बंद केले.

कोर्टी वीज उपकेंद्रा तून कोर्टी,सावडी ,पोंधवडी, गोरेवाडी, हुलगेवाडी व राजुरीच्या सोळा डीपी यांना वीज पुरवठा होतो. मात्र गेल्या आठ दिवसापासून अतिशय अनियमित व एक तास वीज पुरवठा होत नसल्यामुळे शेतकऱ्यांना या वर्षी भरपूर पाणी असून पिकांना पाणी देता येत नसल्याने शेतकरी संतप्त झाले. यामुळेच आज सकाळी शेतकऱ्यांनी वीज उपकेंद्रावर जाऊन ते बंद केले.वीज पुरवठा सुरळीत चालू केल्या शिवाय आम्ही इथून उठणार नाही असा आक्रमक पवित्रा शेतकर्यांनी घेतला आहे.
या दरम्यान आम्ही करमाळा महावितरणचे उपअभियंता सुमित जाधव यांच्याशी संपर्क साधण्याचा प्रयत्न केला असता त्यांचा त्यांना संपर्क होऊ शकला नाही.
