घोटी फसवणुक प्रकरणात पोलिसांशी संपर्क साधण्याचे आवाहन
करमाळा
शेअर मार्केट मध्ये पैसे लावून नफा कमावून देण्याचे आमिष दाखवून लोकांना कोट्यवधी रुपयांना गंडा घालणाऱ्यापैकी आणखी दोघांना करमाळा पोलिसांनी अटक केलेली असून यापूर्वीच एक आरोपी अटकेत आहे. बाळासाहेब पोपट राऊत यांनी दिलेल्या तक्रारीवरुन करमाळा पोलीस स्टेशनला दि १९ ऑगस्ट २४ रोजी गुन्हा दाखल केला होता.
याबाबत सविस्तर माहिती अशी की, मौजे घोटी ता. करमाळा येथील रेवणनाथ लक्ष्मण ननवरे याने मौजे घोटी, केम, तसेच पुणे, बेंगलोर येथील लोकांकडून मोठ्या प्रमाणात रक्कम घेऊन त्यांना पाच टक्के किंवा त्यापेक्षा अधिक परतावा देण्याचे आमिष दाखवून त्यांची फसवणूक केली होती. सदरील आरोपी टेंभुर्णी येथे गाडी लावून फरार झाला होता. यातील मुळ सुत्रधार संशयीत आरोपी रेवणनाथ लक्ष्मण ननवरे यांस पूर्वीच अटक झालेली असून त्याचे इतर दोन साथीदार किशोर दिलीप ननवरे (३७) व धनाजी बापू ननवरे (४३) दोघेही रा. घोटी ता करमाळा यांना पोलिसांनी अटक केलेली आहे. त्यांना न्यायालयाने आज दि ७ डिसेंबर पर्यंत पोलीस कस्टडी सुनावलेली आहे.
उपविभागीय पोलिस अधिकारी अजित पाटील व पोलीस निरीक्षक विनोद घुगे यांच्या मार्गदर्शनाखाली सहा पो.निरीक्षक रोहित शिंदे हे करत आहेत. यासंदर्भात आणखी कोणाची आर्थिक फसवणूक झालेली असेल त्यांनी करमाळा पोलीस स्टेशनशी संपर्क साधावा असे आवाहन पोलिसांच्या वतीने करण्यात आले आहे.