कॅन्सर वरील विशेष संशोधनाबद्दल दोन देशांकडुन अश्विनी भोसले यांना पेटंट बहाल
करमाळा समाचार
येथील रहिवासी असलेल्या व सध्या जिल्हा शिक्षण मंडळ कॉलेज ऑफ फार्मसी हडपसर पुणे येथे ज्ञानदानाचे कार्य करणाऱ्या प्रा. अश्विनी भोसले- ओहोळ यांनी फुफुसावरील मृत कर्करोगाच्या पेशी शोधून काढणारे यंत्र बनवले असून त्याचे पेटंट प्रा. अश्विनी भोसले यांना भारत सरकारकडून बहाल करण्यात आले आहे. गेल्या दोन वर्षाच्या काळात अत्यंत प्रतिकूल परिस्थितीमध्ये त्यांनी हे यंत्र तयार केले आहे.
आयताकृती हे यंत्राद्वारे कॅन्सर च्या डेड सेल (कर्करोगाच्या मृत पेशी) आढळून आल्यास हे यंत्र सतर्क करण्याचे काम करते. या यंत्राद्वारे फुफुसातील कर्करोगाच्या मृत पेशीचे कोणतीही चिरफाड न करता निदान केले जाते. त्यामुळे फुफुसाला जर कर्करोगाची लागण झालेले आढळून आल्यास त्याच्यावर तात्काळ उपचार करणे शक्य होणार आहे. कर्करोगाचे लवकर निदान झाल्याने तो तात्काळ बराही होऊ शकतो. ही काळाची गरज लक्षात घेऊन प्रा. अश्विनी भोसले-ओहोळ यांनी समाज उपयोगी व आरोग्यदायी हे यंत्र तयार केले आहे. प्रा.अश्विनी भोसले यांनी याबाबतच्या पेटंट साठी कोलकत्ता येथे पेटंट कार्यालयात नोंदणी केली आहे. त्यांना “स्मार्ट लंग कॅन्सर डिटेक्टिंग डिव्हाईस” असे नाव दिले आहे.
त्यांच्या या गौरवस्पद कार्याची दखल भारत सरकारने घेऊन यासाठी भारत सरकारने पेटंट बहाल केले आहे. याबरोबरच प्रा. अश्विनी संदिप भोसले यांना लंडन येथून ” पोर्टेबल डिवाइस यूज्ड फॉर बोन कॅन्सर डिटेक्शन” यासाठी त्यांना प्रॉपर्टी ऑफिस युनायटेड किंग्डम असे पेटंट मिळाले आहे. त्यांच्या या उल्लेखनीय कामगिरीबद्दल त्यांचे सर्व स्तरातून अभिनंदन होत आहे. प्रा. अश्विनी भोसले ह्या गुळसडी तालुका करमाळा येथील असून त्या सालसे येथील रहिवासी व साडे उपकेंद्र कार्यरत असलेले डॉ.अशोक भोसले व सेवानिवृत्त परिचारिका सुनिता भोसले यांच्या त्या कन्या आहेत. प्रा अश्विनी भोसले यांनी प्रयोगशाळेमध्ये होणाऱ्या “गॅस लिकेज” सतर्क करणारे ही डिव्हाईस शोधले असुन ते यशस्वी कार्य करत आहे. यावर अंतीम स्वरूप देण्याचे काम सुरू असल्याचे प्रा.अश्विनी भोसले यांनी सांगितले.
सर्वसाधारण २५० ग्रॅम वजनाचे थ्रीडी डायग्राम असलेले १५ सेंटीमीटर लांब व आठ सेंटिमीटर रुंद आकाराचे हे यंत्र बनवलेले आहे. या यंत्राद्वारे छातीवर फिरवून फुफुसाच्या आतील मृत पेशीचे (कॅन्सरचे) निदान करता येते. हे यंत्र छातीवर ठेवून तपासणी केल्यास फुफ्फुसातील मृत पेशी आढळूण आल्यास यंत्र आवाज देते. यामुळे विविध प्रकारच्या कॅन्सरच्या मृत पेशी शोधताना येणा-या अडचणींवर मात करता येते. या यंत्रामुळे तात्काळ फुफुसाच्या कर्करोगाच्या संदर्भात निदान केले जाते. भारतात असलेल्या चार पैकी कोलकाता येथे असलेल्या पेटंट कार्यालयात याची नोंदणी करण्यात आली . यामधून आपल्याला हे पेटंट मिळालेले आहे. यासाठी प्राचार्या अश्विनी शेवाळे तसेच बोहरा सर यांनी मार्गदर्शन केलेले आहे.
– प्रा.अश्विनी संदीप भोसले-ओहोळ