आपल्याला महिती नसलेले बाबासाहेब… विश्वरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंती निमित्ताने
आजही बौध्दांचे आणि अनुसचित जातीचे उध्दारकर्ते अशीच डाॅ बाबासाहेब आंबेडकरांची प्रतिमा माध्यमांनी तयार केलेली आहे.
१०२ वर्षांपुर्वी १९१८ साली त्यांनी शेतकर्यांच्या व्यथा, त्यांच्यापुढच्या शेतीसमस्या मांडणारं पुस्तक लिहिलं. “स्मॉल होल्डींग्ज इन इंडीया अॅंड देअर रेमेडीज” त्यांचे हे पुस्तक किती शेतकरी लोकांना माहित आहे..?

शेतीवरचा बोजा कमी करा, एकच मुल शेतीत ठेवा, बाकीच्यांना तिथून बाहेर काढा नी उद्योग, व्यापार, शिक्षण, सेवा क्षेत्रात घाला. शेतीमालाला योग्य बाजारभाव, सिंचन आणि उद्योगाचा दर्जा मिळायला हवा. शेतकरी सुखी तर देश सुखी. हे उपाय तातडीने केले नाहीत तर शेतकरी डेंजर झोनमध्ये येईल. असं भाकीत त्यांनी शंभर वर्षांपुर्वी केलं होतं. एकप्रकारे त्यांनी शेतकरी आत्महत्त्यांचा इशाराच दिला होता.

डॉ. बाबासाहेबांनी १९२९ साली पहिली शेतकरी परिषद घेतली. त्यांनी विधीमंडळावर काढलेला पहिला मोर्चा दलितांचा नव्हता तर शेतकर्यांचा होता. कसणाऱ्याला जमीन मिळावी म्हणून त्यांनी १९३२ मध्ये खोती रद्द करण्याचे विधेयक लिहिले. १९३६-३८ ला सर्व ताकदीनिशी मुंबई असेंब्लीत ते मंजूर व्हावे म्हणून लढा दिला. शेतकर्यांचे उद्धारकर्ते हे बाबासाहेबांचे योगदान मांडण्यात आम्ही आंबेडकरवादी कमी पडलो का..?
१९१९ साली सर्वप्रथम “सर्व भारतीयांना मतदानाचा अधिकार मिळाला पाहिजे” साऊथबरो कमिटीला सांगणारे असे पहिले व्यक्ती डॉ. बाबासाहेब आंबेडकरच होते. कायदेमंत्रीपदाचा राजीनामा नेहरू सरकारमध्ये ओबीसींना न्याय मिळत नव्हता म्हणून दिला होता हे कितीवेळा सांगितले जाते..? पण बाबासाहेबांनी १९३० मध्ये सर्वप्रथम ओबीसी हा प्रवर्ग जन्माला घातला हे किती बलुतेदार, अलुतेदार लोकांना माहित आहे..?
किती कुणबी, माळी, तेली, वंजारी, आग्री, सुतार, शिंपी, सोनार, मराठ्यांना माहित आहे की बाबासाहेबांच्या हृदयात आणि चळवळीत सर्वाधिक जिव्हाळ्याचा विषय ओबीसी हा होता. स्वतंत्र ओबीसी जनगणनेची १९४६ साली त्यांनीच सर्वप्रथम मागणी केलेली होती.
ज्या भारतरत्न बाबासाहेब आंबेडकरांनी आपल्या देशाला कायद्यांचे ”संविधान” दिल आशा महामानवाची जयंती आम्ही कायदा पालन करून “घरात राहून” साजरी करूयात.
डॉ बाबासाहेब आंबेडकर जयंती…
******अभिवादक – लेखक *****
अतुल वारे पाटील (पत्रकार)
अध्यक्ष, मराठा सेवा संघ करमाळा तालुका