चिखलठाण गटातुन उभा राहण्यासाठी बागलांच्या नावाला पसंती ; कार्यकर्त्यांनी जोर लावला
करमाळा – विशाल (नाना) घोलप
जिल्हा परिषद निवडणुकीची आरक्षण सोडत नुकतीच जाहीर झाली आहे. यामध्ये करमाळा तालुक्यातील सहा पैकी पाच गट महिलांसाठी आरक्षित झाले आहेत. चिखलठाण हा एकमेव जिल्हा परिषद गट सर्वसाधारण वर्गासाठी खुला असून या जिल्हा परिषद गटांमध्ये समाविष्ट असणाऱ्या गावातील मतदार स्वर्गीय दिगंबररावजी बागल मामा यांच्या विचाराला मानणारे असल्याने या भागात दिग्विजय बागल यांच्या नावाला पसंती दिली जात असल्याचे समोर आले आहे. त्यामुळे बागल यांच्या उमेदवारीनंतर संबंधित भागात चुरस निर्माण होऊ शकते.

नुकतेच शिवसेना नेते दिग्विजय बागल यांनी चिखलठाण जिल्हा परिषद गटामधून जिल्हा परिषदेची निवडणूक लढवावी अशी मागणी त्यांना व गटाच्या वरिष्ठ नेत्यांकडे करणार असल्याची माहिती बागल गटाचे समर्थक व चिखलठाण ग्रामपंचायतीचे उपसरपंच अक्षय सरडे यांनी दिली आहे.
तालुक्यात मागील काही दिवसांपासून दिग्विजय बागल हे पांडे गटात उभा राहण्याची शक्यता असल्याची वर्तवले जात होते. परंतु तालुक्यातील सहा जागांपैकी पाच जागा या महिला राखीव पडल्यामुळे बागल यांच्यासह इतर इच्छुक उमेदवारांची ही अडचणी निर्माण झाल्या आहेत. परंतु तालुक्याचे नेतृत्व करत असताना बागल कोणत्याही गटात उभा राहिल्यास त्यांना प्रतिसाद मिळू शकतो ही बाब लक्षात घेऊन बागल गटाचे कार्यकर्ते आता नेत्याला झेडपी मध्ये पाठवण्यासाठी सज्ज झाल्याचे दिसून येत आहे. कसल्याही परिस्थितीत ते यंदाच्या निवडणुकीत बागल यांना झेडपीत पाठवणारच असा मानस केला आहे.

याशिवाय याभागात माजी आमदार संजय शिंदे गटाचे
चंद्रकांत सरडे यांचा दावा असल्याने त्यांना तुल्यबळ माणुस याभागात सर्वसमावेशक व सर्व भागात परिचित असणारा हवा आहे. तसेच आमदार नारायण पाटील व माजी आमदार जयवंतराव जगताप यांच्या गटाची भुमिका महत्वाची आहे. त्यामुळे तीनही गटांचा उमेदवार कोण असेल यावर निवडणुकीची गणीते अवलंबुन राहतील नेमके कोणात्या उमेदवाराचा फटका कोणाला बसतोय त्यावर निकाल अवलंबून राहिल.
