फडणवीसांच्या पाठिंब्यामुळे बागल यांची पुन्हा उभारी ; कार्यकर्त्यांमध्ये नवचैतन्य
करमाळा समाचार
बागल गट मागील बऱ्याच काळापासून अडचणींचा सामना करत असताना भाजपा प्रवेशानंतर थेट महाराष्ट्र पातळीवर काम करण्याची संधी महिला नेत्या रश्मी बागल यांना मिळाल्यामुळे आता बागल गट पुन्हा एकदा उभारी घेताना दिसत आहे. तर येणाऱ्या निवडणुकांच्या दृष्टिकोनातून भाजपाकडून रश्मी बागल यांना संधी मिळण्याची शक्यता असल्याने कार्यकर्त्यांमध्ये नवचैतन्य निर्माण झालं आहे. राखी पोर्णिमेच्या निमित्ताने रश्मी बागल यांनी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना राखी बांधली आहे. प्रवेशापासुन फडणवीस भावाचे कर्तव्य पार पाडतच आहेत भेट म्हणून काय देतील याकडे लक्ष राहिले आहे.
भाजपामध्ये प्रवेश केल्यानंतर लगेचच रश्मी बागल यांना महिला उपाध्यक्ष केल्यानंतर त्यांनी तातडीने सूत्रे हातात घेतली व महाराष्ट्रभर दौरे करून आपल्या कामाची चुणूक दाखवून दिली आहे. तर महिला नेत्या म्हणून यापूर्वीही त्यांना महाराष्ट्र पातळीवर काम करण्याची संधी त्यावेळीचे पक्षही देत होते. परंतु तालुक्यातील कामाचे कारण सांगत त्यांनी तिथे जाणे टाळले होते. पण बागल यांना भाजपने दिलेल्या संधीचं सोनं केल्याचं दिसून येत आहे. त्यामुळे कामांचा पाठपुरावा वेगात सुरू असून येणाऱ्या काळात अडचणीत असलेले कारखाने बाहेर काढण्याचे त्यांचे प्रयत्न असल्याचे दिसून येत आहेत.
बागल हे सध्या महायुती मध्ये असल्याने नेमकी उमेदवारी कोणाला मिळेल यावरून सध्या तर्क लढवले जात आहेत. अपक्ष आमदार संजयमामा शिंदे यांना महायुती पाठिंबा देईल अशी शक्यता आहे. पण लोकसभा पराभवानंतर शिंदे महायुतीकडुन इच्छुक असतील का याबाबत शंका आहे. त्यामुळे शिंदेंच्या नकारानंतर भाजपा व महायती समोर रश्मी बागल यांना मैदानात उतरवण्याशिवाय पर्याय नसणार आहे. यामुळे सर्व कार्यकर्त्यांचे पक्षाच्या भुमिकेकडे लक्ष लागून राहिले आहे.
मुळातच भाजपाने मागील दहा वर्षांपासून देशात व राज्यात सत्ता मिळवली आहे. पण अजूनही करमाळ्यात एकदाही उमेदवारी मिळवलेली नाही किंवा दावाही केला नाही. त्यामुळे तालुक्यात पक्ष वाढीसाठी अडचणीही आल्या आहेत. पक्ष व कार्यकर्तांचे मनोबल वाढवण्यासाठी यंदा बीजेपीने या जागेवर दावा केला तर वावगे वाटणार नाही.