E-Paper

आगामी निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर मतदारांच्या घरोघरी जाऊन नोंदी व दुरुस्ती होणार; महिनाभर चालणार कार्यक्रम

करमाळा समाचार

आगामी लोकसभा निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर आणि भारत निवडणूक आयोगाच्या संक्षिप्त पुनरीक्षण कार्यक्रमांतर्गत हा उपक्रम राबवला जात असल्याची माहिती राज्याचे मुख्य निवडणूक अधिकारी श्रीकांत देशपांडे यांनी दिली. घरी येणाऱ्या मतदान केंद्रस्तरीय अधिकाऱ्यांना सहकार्य करण्याचं आवाहन त्यांनी मतदारांना केलं आहे. राज्यात 21 जुलै ते 20 ऑगस्ट 2023 पर्यंत संपूर्ण महिनाभराच्या काळात मतदानकेंद्रस्तरीय अधिकारी अर्थात बीएलओ घरोघरी भेटी देऊन मतदारांच्या नावांची पडताळणी करणार आहेत.

मतदान केंद्रस्तरीय अधिकारी आपल्या या भेटींमध्ये मतदारांचे वैयक्तिक तपशील, पत्ता आणि छायाचित्रांची पडताळणी करतील. मृत आणि स्थलांतरीत मतदार, दुबार नोंदणी असलेले मतदार, मतदारांचाही शोध घेतील. तसेच मतदार ओळखपत्रासोबत आधार कार्ड जोडण्याची प्रक्रिया करतील. यासोबतच नव मतदार, तृतीयपंथी आणि विमुक्त जाती भटक्या जमातीतील मतदार, देहव्यवसाय करणाऱ्या महिला मतदारांचा शोध घेऊन त्यांची आणि मतदार यादीत नाव नसलेल्यांची नोंदणी करण्याचे कामही या काळात केले जाणार असल्याची माहिती देशपांडे यांनी दिली.

वयाची ची 18 वर्ष पूर्ण केली आहेत पण अजूनही मतदार नोंदणी केलेली नाही अशांची मतदार नोंदणी करुन घ्यावी असं आवाहन केलं आहे. मतदार यादीतील आपले वैयक्तिक तपशील, पत्ता यात काही दुरुस्त्या असतील तर त्यासाठीचे अर्ज भरुन द्यावेत. लग्नानंतर नाव बदललेल्या स्त्री मतदारांनी आपली नावे बदलून घ्यावीत.

वरीलप्रमाणे मा. राज्याचे मुख्य निवडणुक अधिकारी यांनी दिलेल्या आदेशानुसार यात सर्वांनी सहभाग घ्यावा असे आवाहन मा. समाधान घुटूकडे उपविभागीय अधिकारी माढा, विजय जाधव प्रभारीतहसीलदार करमाळा, व बाबासाहेब गायकवाड निवडणुक नायब तहसीलदार यांनी केले आहे.
DMCA.com Protection Status
error: परवानगी शिवाय बातमी कॉपी करू नये. हा कायद्याने गुन्हा आहे !
WP Radio
WP Radio
OFFLINE LIVE