बॅन्ड पथक ते देश विदेशात दिग्गज कलाकरांसोबत काम ; मांगीच्या कलाकराची यशोगाथा
करमाळा समाचार
संगीत क्षेत्रात कोणताही वारसा नसताना शिवाय कुठेही मोठे शिक्षण न घेता केवळ घरातील संगीतमय वातावरणामुळे संगीत क्षेत्राची आवड निर्माण झाली व वडिलांकडून मार्गदर्शन व बंधू कडून प्रेरणा घेत प्रवीण अवचार यांनी गायनाची सुरुवात केली. बॅन्ड पासून सुरुवात केलेल्या अवचर यांना तब्बल तीस वर्षांपासून विविध कार्यक्रम करीत आपला वेगळा ठसा निर्माण केला आहे. तर आज देश विदेशात त्यांचे कार्यक्रमाचे आयोजन केले जाते. कोणत्याही पाठबळा शिवाय अवचर यांनी उत्तुंग यश संपादन केले आहे.
प्रवीण अवचर यांचे मुळगाव मांगी तालुका करमाळा असे आहे. ग्रामीण भागातील कलाकारांनी अशी उत्तुंग भरारी घेणे असे क्वचित दिसून येते. प्रवीण अवचर यांचे वडील जनार्धन अवचर एकतारी भजन गायचे त्यामुळे घरातच संगीतमय वातावरण होते. तर त्यांचे मोठे बंधू राजेंद्र हे भजन सम्राट म्हणून संबोधले जायचे. ते करमाळा येथे ऑर्केस्ट्रा मध्येही गात असत. याशिवाय त्यांचे दुसरे बंधू सुहासकुमार अवचर यांच्यापासून प्रवीण अवचार यांनी प्रेरणा घेत १९९५ पासून शहरातील वेगवेगळ्या बँड पथकात गायनाची सुरुवात केली. तब्बल ४ वर्ष बँड पथकात काम केल्यानंतर ऑर्केस्ट्रा मध्ये अनुभव घेण्यासाठी प्रवीण यांनी अहमदनगर गाठले. या ठिकाणी जोसेफ वाघमारे आणि संजय आठवले यांनी त्यांना मोलाचे मार्गदर्शन केले.
यानंतर २००२ मध्ये पुणे येथील आर्केस्ट्रा मध्ये अवचर यांनी गायनाची सुरुवात केली. मेलोडी मेकर असे या आर्केस्ट्रा चे नाव होते. त्यामध्ये मुळातच दिग्गज कलाकार असताना गायनाची संधी मिळाल्याने त्यांच्याकडून शिकण्याची भाग्य हे अवचर यांना लाभले. याच दरम्यान त्यांना सेलिब्रिटी समोरही गायनाची कला सादर करता आली. त्यानंतर अवचर यांनी विविध आर्केस्ट्रा मध्येही काम केले.
२०१० पासून स्वतःचा म्युझिक कलर्स नावाचा ऑर्केस्ट्रा स्थापन केला. त्यामध्ये त्यांच्यासोबत दिग्गज कलाकार दिसून येतात. त्यामध्ये सुदेश भोसले, अनुराधा पौडवाल, साधना सरगम, श्रेया घोषाल, आशा भोसले, कुमार सानू, शान, सुरेश वाडकर, सोनू निगम यांच्या समवेत देश विदेशात कला सादर करण्याची संधी मिळाली.
गेल्या पंचवीस वर्षात संगीत क्षेत्रात काम करत असताना अनेक राज्य पातळीवरील पुरस्कार मिळालेले आहेत. संगीत क्षेत्राबरोबरच सामाजिक क्षेत्रातील ओळख निर्माण करीत बेटी बचाव, बेटी पढाव या अभियानात उस्फूर्तपणे सहभाग घेत महाराष्ट्रभर जनजागृती केली. कोरोना काळात , कोरोना पासून बचाव करण्याची जनजागृती मोहिमेत मोठा सहभाग, आतापर्यंत देश विदेशात् ४ ते ५ हजार कार्यक्रम झाले आहेत.