सावधान तो बिबट्याच … करमाळा शहरापासून काही अंतरावर फिरतोय बिबट्या
करमाळा समाचार
देवळाली तालुका करमाळा येथे मंगळवारी रात्री सातच्या सुमारास बिबट्या सदृश्य प्राणी दिसल्या बाबत सूचना देण्यात आल्या होत्या. यावेळी एका शेळीवर हल्ला करत बिबट्याने शेळी फस्त करण्याचा प्रयत्न केला होता.
सदरची माहीती रात्री सर्वत्र पसरल्यानंतर गणेशकर व शेख वस्ती दरम्यान बिबट्या सदृश्य प्राणी दिसल्याचे बोलले जात होते. त्या ठिकाणी जाऊन पाहणी केल्यानंतर सदर प्राण्याच्या पावल्याचे ठसे घेण्यात आले व मोहोळ येथील वन निरीक्षक यांना पाठवण्यात आले. यावरून प्रथम दर्शनी तो बिबट्याच असल्याचे श्री कुरले यांनी सांगितले आहे.


यासंदर्भात ग्राम सुरक्षा समितीच्या वतीने सर्वत्र माहितीही देण्यात आली आहे. तर सोशल मिडीया माध्यमातून आलेल्या मेसेजमुळे संभ्रम अवस्था निर्माण होऊ नये तसेच लोकांनी सावध व्हावे यासाठी सरपंच गहिनीनाथ गणेशकर यांनीही सूचना दिल्या होत्या.
यासंदर्भात माहिती आमदार संजय मामा शिंदे यांना मिळाल्यानंतर त्यांनी तात्काळ मोहोळ येथील वन विभागाशी संपर्क साधत सदरची माहिती दिली. यावर लवकरच लक्ष घालून परिस्थिती नियंत्रणात आणण्याचं आश्वासन अधिकाऱ्यांनी दिलं होतं. तरी परिसरातील लोकांनी सतर्क राहण्याचे आवाहन करण्यात आले आहे. सदर ठिकाणी ग्रामसुरक्षा समीती व उपसरपंच यांनी भेटी दिल्या वर परिस्थितीची माहीती घेतली आहे.