सावधान ! वृद्ध महिलेची फसवणुक ; जेऊर येथील प्रकार
करमाळा – विशाल घोलप
अर्धांगवायू वर औषध तयार करून देतो म्हणून घरी आलेल्या अनोळखी दोघांनी वृद्ध महिलेच्या गळ्यातील सोन्याचे एक तोळ्याचे गंठण लंपास केले आहे. याप्रकरणी करमाळा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सदरचा प्रकार ११ जून रोजी जेऊर ता. करमाळा येथे घडला आहे. याप्रकरणी करमाळा पोलिसात दोघांविरोधात गुन्हा दाखल केला आहे.

याप्रकरणी जोशी रा. विद्यानगर करमाळा यांनी फिर्याद दिली आहे. त्यांची आई केशरबाई व वडील पांडुरंग असे जेऊर येथे राहतात. दोघेही वयोवृद्ध असल्याने शारदा जोशी वेळोवेळी या जेऊरला जातात. तसेच त्या ११ जून रोजी दुपारी त्यांना भेटण्यासाठी गेल्या होत्या. यावेळी घरात दोन अनोळखी व्यक्ती आले होते. त्यांनी आई केशरबाई यांना पंतप्रधान योजनेतील सरकारी पैसे मिळवून देतो तुमचे पासबुक द्या असे सांगितले. त्यावेळी दुसरा व्यक्तीने आईला अर्धांगवायू झाला आहे का ? असे विचारले. त्यावर आईने होकार दिल्यानंतर तुम्हाला आजारावर सोन्याच्या पाण्यातून औषध तयार करून देतो असे म्हणाला.

आलेल्या त्या व्यक्तीने औषधासाठी देवघरातून पाण्याचा कलश व आईच्या गळ्यातील सोन्याची गंठण असे दोन्ही घेतले व पाण्यात टाकण्याचा देखावा केला. यावेळी गंठण पाण्यात न टाकता तसेच घेऊन गेले व सदरचे गंठण सव्वा महिना काढू नका असे सांगितले. त्याचे पाणी नंतर प्यावे लागेल असे सुचवल्याने केशरबाई त्या कलशाकडे लक्ष दिले नव्हते. त्यानंतर केशरबाई यांनी मुलीला सर्व प्रकार सांगितला. त्यावेळी त्यांनी कलशामध्ये पाहिल्यानंतर एक तोळ्याचे ४५ हजार रुपयांचे सोन्याचे गंठण दिसून आले नाही. यावरून फसवणूक झाल्याचे लक्षात आले. साधारण ४० ते ५० वय असलेले अनोळखी लोकांचा पोलीस शोध घेत आहेत.