बारामती ॲग्रोला मोठा झटका ? ; आदिनाथ साखर कारखाना सहकारी तत्वावर चालणार !
करमाळा समाचार
श्री आदिनाथ सहकारी साखर कारखाना अखेर सहकारी तत्त्वावर चालण्यासाठी परवानगी डीआरएटी कोर्टाकडून मिळाली आहे अशी माहीती कारखान्याचे अध्यक्ष धनंजय डोंगरे यांनी दिली आहे. याप्रकरणी विद्यमान संचालकांनी न्यायालयात धाव घेतली होती. त्या प्रकरणात आदेश देत असताना २२ ऑगस्ट पर्यंत कर्जाच्या पाच टक्के रक्कम भरण्याचे आदेश न्यायालयाने दिले असल्याचेही डोंगरेंनी सांगितले. तर ते लवकरच भरले जातील असे आश्वासन कारखान्याचे अध्यक्ष धनंजय डोंगरे यांनी दिले आहे. त्यामुळे लवकरच कारखाना हा सहकारी तत्त्वावर चालू होईल अशी अपेक्षा व्यक्त करण्यात येत आहे.

न्यायालयात सदर सुनावणी सुरू असताना बँकेच्या वतीने कारखान्याला थोडीशी सवलत देण्यात आली आहे. महाराष्ट्र राज्य सहकारी बँकेच्या कर्ज परतफेड योजनेत सहभाग करून घेत आदिनाथ कारखान्याच्या संचालकांना एक संधी बँकेने दिली आहे. त्यामुळे आता डी आर ए टी कोर्टानेही संचालक मंडळाला पाच टक्के रक्कम भरण्याची आदेश दिले आहेत.

आदिनाथ सहकारी साखर कारखाना मागील तीन वर्षांपासून बंद आहे. या परिस्थितीत महाराष्ट्र राज्य सहकारी बँकेने सदर कारखाना भाडेतत्त्वावर देण्यासाठी टेंडर काढले होते. सदरचे टेंडर हे बारामती ॲग्रो ने घेतल्यामुळे लवकरच कारखाना सुरू होईल असे वाटत असतानाच बराच काळ गेला तरी कारखाने काहीच सुरू होईना. म्हणून पुन्हा एकदा शेतकरी, कामगार व वाहतूकदार हे हवालदिल झाले होते.
दरम्यानच्या काळात शेतकरी बचाव समितीची स्थापना झाली.या समितीच्या माध्यमातून कारखाना हा सहकारी तत्त्वावर चालला पाहिजे अशी मुख्य भूमिका घेत पैसे भरण्याची ही तयारी दाखवली होती. त्यानंतर कारखाना बऱ्याच दिवसांपासून भाडेतत्त्वावर देण्यासाठी टेंडर झालेले असताना कारखाना सुरू का होत नाही यामुळे संचालक मंडळाने डीआरटी कोर्टात धाव घेतली होती. यावेळी हा निकाल संचालक मंडळाच्या विरोधात गेला.
तर काही लोक उच्च न्यायालयातही गेले होते. यावेळी बँकांनी पाच टक्के रक्कम भरून कारखाने सुरू करू शकतात अशी योजना सूरु केली. त्या आधारावर माजी आमदार नारायण पाटील यांनी एक कोटी रुपये भरून कारखाना सहकारी तत्त्वावर चालला पाहिजे ही भूमिका मांडली होती. त्यानंतर संचालक मंडळांनी डी आर ए टी कोर्टात दाद मागितली. त्यावर निकाल देताना डी आर ए टी कोर्टाने सांगितले आहे की पाच टक्के रक्कम भरल्यानंतर कारखाना संचालक मंडळ सुरू करू शकतो. त्यामुळे आता कारखाना सहकारी तत्त्वावर चालण्याचा मार्ग मोकळा झाला आहे तर ही सर्व माहीती कारखान्याचे अध्यक्ष धनंजय डोंगरे यांनी दिलेल्या माहीतीवरुन आहे. बारामती ऍग्रो च्या भूमिकेकडे पुढे लक्ष राहील.