करमाळाराजकीयसोलापूर जिल्हासोलापूर शहर

भाजपा मोठी खेळी खेळण्याच्या तयारीत ; महिला उपाध्यक्षा रश्मी बागल स्वतः मैदानात उतरण्याची शक्यता

करमाळा समाचार – विशाल घोलप

नुकत्याच नगरपरिषद निवडणुका संपलेल्या असून महानगरपालिकेची रणधुमाळी सुरू आहे. तेवढ्यात जिल्हा परिषदेचा ही बिगुल लवकरच वाजणार असल्याची शक्यता आहे. त्यामुळे पक्षांच्या व नेत्यांच्या वतीने हालचाली सुरू झाल्या आहेत. त्याचाच एक भाग म्हणून तालुक्याच्या राजकारणात मोठे फेरबदल होण्याची शक्यता आहे. एकीकडे माजी आमदार संजयमामा शिंदे गट हा स्वबळावर लढण्याच्या तयारीत असून आ. पाटील यांनी नवे उमेदवार देण्याची तयारी सुरू केली आहे. तर बागलांकडून झेडपीच्या रणांगणात पहिल्यांदाच रश्मी बागल यांची उमेदवारी जाहीर केली जाऊ शकते असे दिसून येत आहे.

करमाळा तालुक्याच्या राजकारणात मागील काही काळापासून ऐनवेळी मोठे फेरबदल होताना दिसून येत आहेत. अचानक कोणत्याही उमेदवारी व भूमिकांमुळे तालुक्याचे राजकारण ढवळून निघते त्याच पद्धतीने आता जिल्हा परिषद निवडणुकांच्या आधी मोठा फेरबदल होणार असल्याचे दिसून येत आहे. करमाळा तालुक्याच्या राजकारणात विधानसभा निवडणूक लढवलेले व मागील काही काळापासून महाराष्ट्र तसेच महाराष्ट्र बाहेरील बीजेपीचे सक्रिय काम पाहत असलेल्या महिला प्रदेश उपाध्यक्ष रश्मी बागल यांचे नाव जिल्हा परिषद निवडणुकीच्या माध्यमातून चर्चेत आले आहे.

विशेष म्हणजे केवळ बागल गटच यात पुढाकार घेत आहे असे नाही. तर पक्षाकडूनही रश्मी बागल यांचे नाव पुढे करत असल्याच्या चर्चा आहेत. यामुळे तालुक्याच्या राजकारणात बागल गटात नवचैतन्य निर्माण झाले आहे. सर्वत्र बागल यांच्या उमेदवारीची चर्चा रंगलेली आहे. यामुळे पाटील, बागल, जगताप यांच्या बाजुने कोणता उमेदवार बागल यांच्या समोर तुल्यबळ ठरु शकेल यावर खलबते सुरु झाली आहेत.

यासंदर्भात भाजपाच्या नेत्या रश्मी बागल यांच्याशी संपर्क करण्याचा प्रयत्न केला तर त्यांनी अद्याप असे काहीच ठरलेले नसून वरिष्ठ जे निर्णय घेतील तो मान्य असेल अशी प्रतिक्रिया दिली आहे. त्यामुळे थेट जरी बागल यांनी मान्य केले नसले तरी हालचाली मात्र त्याच पद्धतीने सुरू असल्याच्या दिसून येत आहेत. यामुळे बागल या मैदानात उतरल्यानंतर विरोधकांकडून कोणती रणनीती आखली जाईल याकडेही लक्ष लागून राहणार आहे. पण बागल यांच्या उमेदवारीमुळे बागल गटात मात्र नवचैतन्य आले असून त्या मैदानात उतरतील का ? आणि आल्या तर कोणत्या गटातुन मैदानात उतरणार याकडे लक्ष लागुन राहिले आहे.

error: परवानगी शिवाय बातमी कॉपी करू नये. हा कायद्याने गुन्हा आहे !
WP Radio
WP Radio
OFFLINE LIVE