भाजपाची धुसफुस चव्हाट्यावर ; भाजपा माजी तालुकाध्यक्षाला मारहाण
प्रतिनिधी- करमाळा समाचार
करमाळा तालुक्यात भाजपा पक्षाची बैठक करमाळ्यात पार पडल्यानंतर बैठकीतील वक्तव्यावरुन झालेल्या वादानंतर भाजपाचे माजी तालुकाध्यक्ष शशिकांत पवार यांना मारहाण झाली आहे. सदरची मारहाण विद्यमान पदाधिकाऱ्यांना विरोध केल्यामुळे झाली असल्याचे बोलले जात आहे. या प्रकरणी दोन्ही गटाकडुन परस्पर विरोधी गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. पण नेमकी मारहाण कशामुळे झाली हे अजुन उजेडात आले नाही.

करमाळा तालुक्यात भाजपामध्ये चार गट असल्याबाबत सर्वश्रुत आहे. विद्यमान तालुकाध्यक्ष गणेश चिवटे, माजी तालुकाध्यक्ष शशिकांत पवार, शहराध्यक्ष जगदिश अगरवाल, सिनेट सदस्य दिपक चव्हाण, चंद्रकांत राखुंडे असे पदाधिकारी कायम चर्चेत असतात. यामध्ये कोण कोणाला जवळ करण्यास किंवा दुसऱ्यांची किंमत वाढु देत नसल्याबाबत आरोप करीत सर्वच एकाच पक्षात असुन वेगवेगळ्या पध्दतीने कामे करतात येवढेच काय तर प्रत्येक आंदोलनेही वेगवेगळी केली जातात.
दोन दिवसापूर्वी खा. रणजितसिह निंबाळकर यांच्या उपस्थितीत करमाळा येथे बैठक झाली. त्यामध्ये पदाधिकाऱ्यांनी आपापली नाराजीही व्यक्त केली. पण माजी तालुकाध्यक्ष शशिकांत पवार यांनी उघडपणे विद्यमान बॉडी विश्वासात घेत नसुन कुठेही बोलवले जात नसल्याबाबत नाराजी व्यक्त केली. तरी सदर कार्यक्रम संपल्यानंतर पवार व चिवटे समर्थकात थोडी बाचाबाची झाली. पण थोड्या वेळानंतर काही युवकांनी पवार यांच्या कृषी केंद्रात जाऊन त्यांच्यावर हल्ला केला यात ते जखमी झाले तर तो हल्ला नेमका कशातुन झाला हा पोलिस शोध घेत आहेत. पण आरोपीच्या पिंजऱ्यात असलेले युवक हे गणेश चिवटे समर्थक असल्याने या प्रकरणाकडे बघण्याचा दृष्टिकोन बदलला आहे. नेमकी मारहाण का झाली कोणामुळे झाली याचा शोध सुरु आहे. पण यातुन आज पर्यत तालुका बीजेपीत सुरु असलेली धुसफुस चव्हाट्यावर आली आहे. सभ्यता मिरवणाऱ्या पक्षाला न शोभणारी घटना घडल्याने सर्वत्र नावे ठेवली जात आहेत.
