लाचेची मागणी केल्याप्रकरणी अटकेत असलेल्या मंडळ अधिकार्यास जामीन
करमाळा समाचार
तक्रारदाराने कुणबी दाखला मिळणे कामी तहसीलदार करमाळा यांच्याकडे अर्ज दाखल केला होता व सदरचा अर्ज पडताळणी कामी केतुर येथील मंडळ अधिकारी शंकर विठ्ठल केकान यांच्याकडे आलेला होता. सदर पडताळणीचे कामासाठी रक्कम रुपये तीन हजार रुपयांच्या लाचेची मागणी हाताने खूनवून केल्याबाबत तक्रारदाराने अँटी करप्शन ब्युरो सोलापूर यांच्याकडे दाखल केली होती.

सदरची मागणी खरी आहे किंवा कसे याबाबत पडताळणी दिनांक 22 /08 /2024 रोजी केतुर येथील मंडळ अधिकारी कार्यालय येथे झाली व नंतर 19 /09/ 2024 रोजी सदरची फिर्याद तक्रारदाराने दाखल केलेली होती. सदर केस मध्ये शंकर विठ्ठल केकान मंडळ अधिकारी केतुर यांना 20/09/2024 रोजी अटक करण्यात आली होती. तर नंतर त्यांनी एडवोकेट निखिल पाटील यांचे मार्फत जामीन मिळणे कामी बार्शी येथील अतिरिक्त सत्र न्यायालय येथे जामीन अर्ज दाखल केला.

सदर जामीन अर्जाची सुनावणी माननीय अतिरिक्त सत्र न्यायाधीश श्री मांडे साहेब यांच्यासमोर झाली. सदर जामीन अर्जाचे युक्तीवादावेळी आरोपीचे वकील एडवोकेट निखिल पाटील यांनी त्यांचे युक्तिवादात सदरचे प्रकरण पडताळणी कामी मंडळ अधिकारी श्री शंकर विठ्ठल केकान यांच्याकडे दिनांक 21 /08 /2024 रोजी आलेले होते व तदनंतर त्यांनी 22/8/2024 रोजी सदरची पडताळणी पूर्ण करून त्याचा अहवाल तक्रारदार यांच्याकडे हाती दिलेला होता. सदरचे काम त्याच दिवशी पूर्ण केलेले असल्याने लाच मागण्याचा कोणताही प्रश्न निर्माण होत नव्हता व यातील मंडळ अधिकारी यांनी कधीही लाचेची मागणी केलेली नसून तसा सक्षम पुरावा तक्रारदार यांचेकडे नसून केवळ द्वेष भावनेतून सदरची तक्रार दाखल झालेली असून तपासामध्ये आरोपीविरुद्ध कोणताही पुरावा मिळून आलेला नाही असा युक्तिवाद केला.
सदरचा युक्तिवाद ग्राह्य धरून आरोपी शंकर विठ्ठल केकान यांची 50 हजार रुपयांच्या जात मूचलक्यावर जामीनावर मुक्तता करण्यात आली. सदर प्रकरणी आरोपीतर्फे ऍडव्होकेट निखिल पाटील, एडवोकेट दत्तप्रसाद मंजरथकर, एडवोकेट सतपाल नरखेडे, एडवोकेट श्रीराम अंधारे यांनी काम पाहिले.