अपुऱ्या यंत्रणेमुळे जनावरांच्या आरोग्याचा प्रश्न ; बोगस डॉक्टरांच्या उपचारावर प्रश्नचिन्ह
करमाळा समाचार
तालुक्यात जवळपास एक लाख ५० हजार वेगवेगळ्या प्रकारची जनावरे असून याचा संपूर्ण भार पशुसंवर्धन विभागातील एकूण ३६ कर्मचाऱ्यांवर पडतो. तालुक्यात मुळातच ५३ पदे मंजूर असून त्यातही १७ पदे रिक्त असल्याने पशुधन व इतर जनावरांना उपचारासाठी इतर मार्ग शोधावे लागतात. यावेळी कमी अनुभवी असलेले कोणत्याही प्रकारची पदवी नसलेले डॉक्टर शेतकऱ्यांच्या या अडचणीचा फायदा उचलत पैसे उकळत आहेत. यामुळे जनावरांच्या जीवीताला धोका पण उद्भवू शकतो. यावर तोडगा काढण्यासाठी प्रशासनाने लक्ष देणे गरजेचे आहे.
तालुक्यात एकूण नऊ ठिकाणी प्रथम श्रेणी तर नऊ ठिकाणी द्वितीय श्रेणीचे इमारती असलेले दवाखाने उपलब्ध आहेत. परंतु यामधील सात दवाखान्यांमध्ये कायमस्वरूपी कर्मचारी व वैद्यकीय अधिकारी नसल्यामुळे प्रभारी डॉक्टरांना या ठिकाणची भेट देऊन उपचार करावे लागतात. त्यामध्ये करमाळा, गुळसडी, केतुर, केम, जिंती, कामोणे अशा गावांचा समावेश आहे. यामुळे ग्रामीण भागातील जनावरांचे उपचार करण्यासाठी तुटपुंज्या साधनसामग्रीसह तालुक्यातील ३६ कर्मचाऱ्यांना तब्बल दीड लाख जनावरांचे देखभाल करावे लागते. यामुळे बऱ्याच वेळा जनावरांना उपचारासाठी उशीर होतो. त्यातून जनावर दगावण्याचा धोकाही आहे. विशेष म्हणजे माणूस वगळता सर्व प्रकारची जनावरे व त्याची देखभाल उपचार हे पशुवैद्यकीय दवाखान्यातून केले जातात.
शासकीय दवाखान्यात सरकारी डॉक्टरांकडुन तपासणी फी केवळ १० रुपये तर घरी येऊन तपासणी केल्या दिडशे ते दोनशे खर्च घेतला जातो. पण खाजगी लोक यांचे आव्वाचे सव्वा पैसे आकारुन शेतकऱ्यांना लुटत आहेत. ग्रामीण भागात बोगस डॉक्टरांची संख्याही मोठ्याप्रमाणावर वाढलेली आहे. तर त्यांना नेमके कोणते औषध किती प्रमाणात द्यायचे याचे प्रमाण लक्षात येत नाही. त्यामुळे जनावरांना त्रास होऊ शकतो. मुळातच जनावरांच्या मानाने तालुक्यात तुटपुंजी यंत्रणा व कर्मचारी संख्या आहे. ग्रामीण भागातील पशुधन वाचवण्यासाठी शासनाने कर्मचारी वाढवण्याची गरज आहे. रिक्त जागा भरुन योग्य वैद्यकीय अधिकारी आठरा केंद्रावर उपलब्ध करुन दिल्यास शेतकऱ्यांची अडचण दुर होईल.
प्रथम व द्वितीय श्रेणी दवाखाने ..
प्रथम श्रेणीमध्ये करमाळा, केतुर, झरे, साडे, उमरड, वीट, गुळसडी, जेऊर, फिसरे तर द्वितीय श्रेणीमध्ये कोर्टी, केम, पांगरे, कोळगाव, कामोणे, करंजे, तरडगाव, जिंती व वाशिंबे या ठिकाणी चे दवाखाने आहेत. तालुक्यात गाय एकूण ६४ हजार ३६, म्हैस एकुण २७ हजार ४६४, मेंढ्या ६ हजार १३०, शेळी ५२ हजार २२४ तर डुकरे ४०६ असे प्रमाण नोंदवण्यात आले आहेत. मागील वेळी अचानक लम्पीची साथ आली व ऐनवेळी सर्वच जनावरांचे लसीकरण करण्यासाठी कर्मचारी अपुरे पडू लागले होते. यावेळी खाजगी तत्त्वावर नेमलेल्या कर्मचाऱ्यांची मदत घेण्यात आली होती.
पाठपुरावा सुरु आहे …
कर्मचाऱ्यांच्या अपुऱ्या संख्येबाबत वरिष्ठांची पाठपुरावा सुरू आहे. तर तालुक्यात ज्या ठिकाणी कर्मचारी संख्या कमी आहे. त्या ठिकाणी कर्मचारी पाठवून उपचार दिले जातात. लवकरच कर्मचारी उपलब्ध होतील. तर मागील काळात लंम्पी आजार पसरू नये याची काळजी घेण्यात आली होती. मोठ्या प्रमाणावर लसीकरण झाले आहे व सध्याही सुरू आहे. अद्यापही लंम्पी पूर्णपणे गेलेला नसल्याने लसीकरण सुरूच आहे. तालुक्यातील शेतकऱ्यांनी लांबीचे लसीकरण करून घेणे गरजेचे आहे.
– डॉ. मनिष यादव, तालुका पशुवैद्यकीय अधिकारी, करमाळा.
खासगींकडे जावे लागते…
पश्चिम भागात जनावरांची संख्या अधिक असताना देखील या भागात कायमस्वरूपी डॉक्टर उपलब्ध नसतात. आम्हाला खासगी डॉक्टरांकडून इलाज करावा लागतो. त्यामुळे आधीच खर्च होतो. शिवाय इलाज योग्य प्रकारे न झाल्याने जनावराला धोका निर्माण होतो. त्यामुळे जिंती भागात इमारत उपलब्ध आहे. त्या ठिकाणी कायमस्वरूपी वैद्यकीय अधिकारी उपलब्ध करून द्यावेत.
– दिलिप दंगाणे, शेतकरी, जिंती.