सात बहिणींना वगळुन भावाचे एकट्याचे नाव ! ; सिद्ध करण्यासाठी महत्वाचा पुरावा झाला गहाळ – संबंधित कर्मचाऱ्यांच्या विरोधात महिलादिनी उपोषण
करमाळा समाचार
वडिलांच्या निधनानंतर सात बहिणींची नावे वगळून एकट्या भावाने स्वतःची वारस नोंद लावली. बेकायदेशीर व संगनमताने दिलेल्या वारस नोंदीचा भक्कम पुरावा म्हणजेच वारस संचिका तलाठी कार्यालयाने गहाळ केली अशा परिस्थितीत बार्शी(barshi) येथील सदर कर्मचाऱ्यांच्या विरोधात कारवाई करावी या मागणीसाठी महिला दिनाचे मुहूर्तावर सोलापूर प्रांत कार्यालयासमोर बहिणींनी उपोषण करण्याचे ठरवले आहे.

बार्शी येथील गट क्रमांक 1193, 1195, 1197 या शेतजमिनीवर वडिलांच्या निधनानंतर बहिणींची नावे वगळून एकट्या भावाची नोंद लागलेली आहे अशी तक्रार बहिणींची असुन सदर बाब न्यायप्रविष्ट आहे. याबाबत 7 पैकी 1 स्मिता माने (karamala) यांनी वारसा नोंदी साठी बार्शी येथील न्यायालयात दाद मागितली आहे. प्रकरण 2014 पासून प्रलंबित आहे. शिवाय अप्पर आयुक्त यांच्या कार्यालयातही दाद मागितलेली आहे.

त्याचा निकाल लवकर होणे अपेक्षित आहे. मात्र त्यासाठी लागणारा महत्त्वाचा पुरावा म्हणजे वारस संचिका ही स्मिता माने यांना मिळत नाही. त्यामुळे गेली दोन वर्षांपासून मागणी करूनही दखल घेतली जात नाही.
संबंधित कार्यालयातील कागदपत्रे गहाळ केल्याप्रकरणी जबाबदारी निश्चित करून संबंधितावर कारवाई करण्यात यावी असा अर्ज आठ महिन्यांपूर्वी प्रांत अधिकारी सोलापूर यांच्याकडे माने यांनी केलेला आहे. त्याची प्रत जिल्हाधिकारी सोलापूर यांना दिल्यानंतर त्यांच्याकडून देखील संबंधितावर कारवाई करण्यात यावी असे पत्र निर्गमित होऊन सहा महिने झाले. तरीही काहीच कारवाई न झाल्याने ऊपोषणाचे पाऊल उचलण्यात आले आहे.
श्रीमती माने या आठ मार्च पासून पतीसह सोलापूर येथील प्रांत कार्यालयासमोर बेमुदत उपोषण करणार आहेत. तर त्यांना पाठींबा म्हणून इतर बहिणी चक्री उपोषणासाठी बसणार आहेत. अशा पद्धतीने जर महिलांना आपला न्याय व हक्क मागण्यासाठी संबंधित कार्यालयाकडे चपला झिजवाव्या लागत असतील. तर यापेक्षा दुर्दैव कुठले आहे. यामध्ये आपण वारस असुनही वारस नोंद सिद्ध करु शकत नसु तर मग अशा अधिकाऱ्यांच्या व कर्मचाऱ्यांच्या चुकीच्या कामांमुळे असे कितीतरी गैरव्यवहार खपवले जातील याकडे शासनाने लक्ष देणे गरजेचे आहे.