अचानक लागलेल्या आगीत मालट्रक जळुन खाक ; करमाळा अहमदनगर मार्गावरची घटना
करमाळा समाचार
करमाळा अहमदनगर रस्त्यावर मांगी परिसरात आज एका माल ट्रकने पेट घेतल्याने बराच काळ वाहतूक खोळंबली होती. या ठिकाणी करमाळा पोलीस व अग्नीशमन दल पोहचल्यामुळे आग आटोक्यात आणण्याचे प्रयत्न केले गेले. बराच वेळ सदरची माहिती संबंधित यंत्रणा मिळाली नसल्याने आग विझवण्यासाठी उशीर झाला. तर आधीचा भडका इतका मोठा होता की शेजारी असलेल्या ऊसालाही यामुळे धग लागुन नुकसाने झाले आहे.

करमाळा शहरातून अहमदनगर कडे जात असताना तामिळनाडू येथील माल ट्रकला मांगी येथील पुलावर अचानक आग लागल्याने संपूर्ण माल ट्रक जळून खाक झाले आहे. यावेळी करमाळा पोलीस ठाण्याचे पोलिस नाईक हिंगमिरे, नाईक जगताप,हवालदार शेख, कॉन्स्टेबल कांबळे, कदम, पवार यांनी घटनास्थळी भेट दिली व अग्निशामक गाडीला बोलवल्यानंतर सदर आग आटोक्यात आणण्याचे प्रयत्न केले गेले.

सदरच्या माल ट्रक मधील चालक व क्लीनर दोघेही पसार झाले असून आगीचे नेमके कारण समजू शकले नाही. तरी ट्रकच्या माहितीवरून करमाळा पोलिसांनी सदरच्या मालकाला संपर्क केला आहे. यावरून पुढील कार्यवाही सुरू आहे.