चोर धार्जिणे करमाळा आगार ? ; बंद व पंचर गाड्यानंतर आता नवीन समस्या
करमाळा समाचार
करमाळा आगाराची सध्या अतिशय दयनीय अवस्था झाली असून बस तर बंद पडतच आहेत. याशिवाय खराब टायरमुळे अधून मधून गाड्या कुठेही पंचर होत आहेत. याशिवाय आता महामंडळातील गाड्या व इतर व्यवस्थेवर लक्ष ठेवून असणारा तिसरा डोळा म्हणजे सीसीटीव्ही बंद पडल्याने चोरट्यांनी धुमाकूळ घातला आहे. परिसरात बस मध्ये चढताना चोरीचे प्रमाण वाढले ते दिसून येत आहे. तरीही महामंडळ प्रशासन झोपेत असल्याचं दिसून येत आहे.
मागील वर्षभरात महामंडळातील बऱ्याचश्या गाड्या रस्त्यात कुठेही बंद पडण्याचे प्रमाण मोठ्या प्रमाणावर वाढले होते. यावर बऱ्याच वेळा तक्रारी व इशारे देऊनही महामंडळाला मात्र कोणताही फरक पडलेला नाही. त्यात खराब टायर महामंडळाला नशिबी आल्याने ते टायर ही अधून मधून कुठे ना कुठे पंचर झालेले दिसून येतात. याचा फटका प्रवाशांना तर बसतोच पण ज्यांना केवळ एसटी वाहक आणि चालक म्हणून कामावर रुजू केले आहे, त्यांना टायर बदलण्याची ही काम करावे लागत आहे. अशामुळे प्रवाशांसह कर्मचाऱ्यांनाही अडचणींचा सामना करावा लागत आहे.
सध्या बस बंद पडण्याची परिस्थिती एवढ्या मोठ्या प्रमाणावर वाढली आहे की लोक ‘रोजचच मड आणि त्याला कोण रड’ असं म्हणत याकडे दुर्लक्ष करू लागले आहे. तर युवकांनी समाज माध्यमातील उठवलेल्या आवाजाकडेही महामंडळ कानात बोळे घालून गप्प पडून आहे. त्यातच आता कमीला भरती परिसरातील सीसीटीव्ही बंद पडल्याने महामंडळ आगारात चोऱ्यांचे प्रमाण वाढले आहे. मागील महिनाभरापासून बंद असलेला हा तिसरा डोळा चालू करण्याची तयारी होत नाही. मागील काही काळात या ठिकाणी अनोळखी व्यक्तींचे मृतदेह मिळून आले होते. त्याशिवाय विविध ठिकाणी चोऱ्याही झाल्या होत्या. सीसीटीव्ही च्या माध्यमातून प्रकार उघडकीस आले होते. पण आता बंद सीसीटीवीमुळे चोरांचा फायदा या ठिकाणी होताना दिसत आहे.
जिल्ह्याच्या टोकाला असल्यामुळे तालुक्यासह इतर भागातूनही मोठ्या प्रमाणावर गाड्या करमाळा आगारात येतात. या ठिकाणी सीसीटीव्ही बंद असल्यामुळे चोरांना अधिकच फायदा होताना दिसत आहे. रात्री अपरात्री या भागात बरेचशे प्रवासी ही थांबलेले असतात. त्यावर सीसीटीव्ही नजर ठेवून असतात. महामंडळाने वरिष्ठ कार्यालयाला पत्र व्यवहार करूनही सीसीटीव्ही दुरुस्त केले जात नाही. शिवाय करमाळा आगारही एवढे उत्सुक दिसत नाही.