आ. रोहित पवारांचा समाजमाध्यमाव्दारे अभिनव उपक्रम
–विधिमंडळातील प्रश्नांसाठी फेसबुक, व्टिटरचे सभागृह
करमाळा समाचार

नुकत्याच पार पडलेल्या अर्थसंकल्पीय अधिवेशनात कोरोनाजन्य परिस्थितीमुळे व विरोधकांच्या गदारोळामुळे लोकप्रतिनिधींना प्रश्न मांडण्यास पुरेसा वेळ मिळाला नाही. याच पार्श्वभूमीवर काही मांडलेल्या व मांडता न आलेल्या नियोजीत प्रश्नांसाठी समाजमाध्यमच सभागृह करण्याची अभिनव संकल्पना कर्जत जामखेडचे आ. रोहित पवार यांनी सुरु केली आहे.

आपल्या प्रत्येक उपक्रमाला समाजमाध्यमाची जोड देऊन लोकहितासाठी सतत कार्यरत राहणे ही कर्जत जामखेडचे लोकप्रिय आ. रोहित पवार यांची ओळख आहे. आमदार झाल्यापासून जेव्हा जेव्हा विधिमंडळात अधिवेशनादरम्यान प्रश्न मांडण्याची वेळी आली, तेव्हा रोहित पवार यांनी अभ्यासपूर्ण पध्दतीने मतदारसंघासोबतच राज्यातील विविध मुद्द्यांवर सभागृहात प्रश्न उपस्थित केले. यामध्ये राज्यातील शेतकरी, तरूण, उद्योजक अशा सर्वच घटकांचा समावेश होता. दरम्यान नुकत्याच झालेल्या अर्थसंकल्पीय अधिवेशनात कोरोनाच्या महामारीमुळे एकंदरीतच कामकाजावर आलेली वेळेची मर्यादा व विरोधकांनी सभागृहात केलेला गदारोळ यामुळे राज्यातील अनेक आमदारांना प्रश्न मांडण्यासाठी पुरेसा वेळ मिळाला नाही.
मात्र या अधिवेशनात नियोजीत प्रश्नांना मांडण्याची संधी मिळाली नाही म्हणून विषय सोडून न देता, या प्रश्नांवर सातत्याने पाठपुरावा करण्याचे कार्य आ. रोहित पवार करताना दिसून येत आहेत. आ. रोहित पवार यांनी विधिमंडळातील आपल्या प्रश्नांना फेसबुक, व्टिटरचे माध्यम दिले आहे. यासंदर्भात त्यांनी एक व्टिट देखील केले आहे. यामध्ये रोहित पवार म्हणतात की, “विधिमंडळात अनेक विषयांवर सरकारचं लक्ष वेधण्याचा मी प्रयत्न केला. काही प्रश्नांना लेखी उत्तरं मिळाली, मात्र वेळेअभावी सर्वच प्रश्नांवर चर्चा होऊ शकली नाही, परंतु जनहिताच्या दृष्टीने या प्रश्नांचा पाठपुरावा मी करत राहील. तुमच्या माहितीसाठी हे मुद्दे इथं शेअर करत आहे.”
आतापर्यंत आ. रोहित पवार यांनी ई-कचरा गंभीर समस्या, जैववैद्यकीय कच-याची समस्या, प्रदूषण, फुलशेती धोरणाची गरज व शहरी बेरोजगारी या प्रश्नांवर आपल्या समाजमाध्यमाव्दारे भाष्य केले आहे. प्रत्येक विषयाचे महत्व नागिरकांना व परिणामी यंत्रणांना कळावे, यासाठी त्या विषयाची पार्श्वभूमी व उपस्थित करण्यात आलेले मुद्दे पोस्टच्या माध्यमातून आ. रोहित पवार विस्तृतपणे सांगत आहेत.