आ. रोहित पवारांच्या पाठपुरावा ; भारतमाला योजना फक्त चापडगाव पर्यतच सोलापूर जिल्ह्याला प्रतिक्षा
करमाळा समाचार
कर्जत चे आमदार रोहित पवार यांच्या पाठपुराव्यानंतर अहमदनगर ते चापडगाव पर्यंत भारतमाला परियोजनेतून राष्ट्रीय महामार्ग करण्यासाठी मंजुरी मिळाली आहे. पण त्या नंतर जातेगाव ते टेंभुर्णी पर्यंत जुन्याच कंत्राटदारांनी पहिले काम पुर्ण न केल्याने हा रस्ता केंद्राकडे हस्तातरीत न झाल्याने बांधा आणी वापरा या योजनेतुनच पहिले कंत्राटदार काम करणार असल्याने भारतमाला योजनेत करमाळा तालुक्यातील जवळपास ६५ किमींचा रस्ता अजुनही घेण्यात आलेला नाही. तर नगर परिसरातील ८० किमींच्या रस्त्याला मात्र मंजुरी मिळाली आहे.

बर्याच वर्षांपासून अहमदनगर टेंभुर्णी महामार्गाचे काम रखडल्याने मोठ्या प्रमाणावर याठिकाणी अपघात झालेले आहेत. करमाळा ते टेंभुर्णी या परिसरातच आतापर्यंत जवळपास दीडशे ते दोनशे लोकांचे जीव गेले आहेत. त्यानंतर स्थानिक आंदोलने तसेच पुढाऱ्यांच्या पाठपुराव्यानंतर कमीत कमी रस्त्याची डागडुजी करण्यात आली. पण तात्पुरत्या स्वरूपाची डागडुजी असल्याने पुन्हा तो रस्ता खराब होऊ लागला आहे. तर हा रस्ता केंद्र शासनाकडे हस्तांतरित होणार होता. पण त्यातही रस्त्याचे दोन वेगवेगळे गट पडल्याचे दिसून येत आहे. अहमदनगर ते टेंभुर्णी हा अखंड रस्ता केंद्र शासनाच्या कडे हस्तांतरित करून भारतमाला परियोजनातून हे काम होणे अपेक्षित होते. परंतु या आधीच्या कंत्राटदार सुप्रीम कंपनीने टेंभुर्णी ते जातेगाव काम अपूर्ण ठेवल्याने संबंधित बँकेने ते काम कल्याण टोल इंफ्राट्र्कश्चर कडे सोपवले आहे.

म्हणुन पुन्हा एकदा पुर्वीचे कंत्राटदार सुप्रीम कंपनी ही न्यायालयात दाद मागण्यासाठी गेल्याने कल्याण कंपनीला काम सुरू करण्यासाठी अडचणी निर्माण होतील की काय अशी शक्यता वर्तवली जात आहे. दरम्यान कर्जत जामखेड चे आमदार रोहित पवार व खा. सुजय विखे यांच्या प्रयत्नातुन अहमदनगर चापडगाव एकुण ८० किमींचा मार्ग हा भारतमाला योजनेतुन मान्यता मिळवली व त्याची निविदाही निघाली आहे. पण अनेक वर्षापासून रखडलेल्या करमाळा तालुक्यातील ६५ किमींचा रस्ता अजुनही सुरु होताना दिसत नाही. यापूर्वी करमाळ्याचे आमदार संजयमामा शिंदे यांनी या रस्त्यासाठी टेंभुर्णी जातेगाव पर्यत निधीही उपलब्ध करुन मार्ग खुला केला पण कंपनी व बॅंकेच्या अंतर्गत वादातुन पुन्हा रस्त्याचे काम रखडल्याचे दिसुन येत आहे.