तेरा मते मिळवणाऱ्या पुतण्यामुळे चुलत्याचा एका मताने पराभव ; त्याठिकाणचे विजयी उमेदवार व मिळालेली मते
करमाळा समाचार
ग्रामपंचायत निवडणुकांमध्ये एका मताची किंमत काय असते हे नुकतेच वडशिवणे गावातील ग्रामस्थांना लक्षात आले आहे. आपल्या नजीकच्या लोकानी साथ सोडली तर काय होते याचा कडवा अनुभव वडशिवणे गावातील लक्ष्मण मोरे यांना आला आहे. त्यामुळे वडशिवणे गावात बागल गटाचा एक उमेदवारही कमी झाला आहे. या गावात ९ पैकी सात जागांवर बागल गटाची सत्ता आली आहे. पण बागल गटाचे खंदे समर्थक मोरे हे अवघ्या एका मताने पराभुत झाले आहेत.

तालुक्यात आठ ग्रामपंचायतीच्या निवडणुका पार पाडल्या यामध्ये वांगी ग्रामपंचायतचे विभाजन होऊन पाच गावांमध्ये चार ग्रामपंचायत तयार झाल्या आहेत. तर आवाटी, सातोली, बिटरगाव व वडशिवणे या ग्रामपंचायतीच्या मुदत संपल्यामुळे या ठिकाणी निवडणुका जाहीर झाल्या होत्या. सर्व प्रक्रिया ही शनिवारी पार पडली. यावेळी मतमोजणीच्या वेळी वडशिवणे गावाची चर्चा दिवसभर रंगली होती त्याला कारणे ही तशीच होती.

तालुक्यात इतर ठिकाणी युती व आघाड्या स्थानिक गटातटा प्रमाणे ठरवण्यात आल्या होत्या व त्या त्याप्रमाणे निवडणुकाही पार पडल्या. पण वडशिवणे गावात कट्टर प्रतिस्पर्धी जगताप व बागल हे पुन्हा एकदा आमने-सामने आले होते. या ठिकाणी बागल गटाने बाजी मारत सात जागांवर विजय मिळवला. पण एक जागा केवळ एका मताने बागल गटाला पराभव पत्करावा लागला आहे. नऊ सदस्यांच्या या ग्रामपंचायतीमध्ये सात बागल तर दोन जगताप गटाला जागा मिळाल्या.
एका मताने या ठिकाणी लक्ष्मण मोरे यांचा पराभव झालेला असल्याने सदर विषयी चर्चेचा तर होता. या ठिकाणी लक्ष्मण मोरे यांच्या पराभवाला कारणीभूत असलेले त्यांचेच पुतणे गजानन मोरे यांनी अपक्ष उमेदवारी लढवल्याने त्यांना तेरा मते मिळाली. जरी ते मतांमध्ये काहीच करू शकले नसले तरी त्यांनी जे करायचं ते करून गेले होते. गजानन मोरे यांच्या तेरा मतांमुळे लक्ष्मण मोरे यांना मते कमी पडली व केवळ एका मताने लक्ष्मण मोरे यांचा पराभव या ठिकाणी झाला आहे.
विशेष म्हणजे या ठिकाणी प्रसाद पाठक यांना 207 लक्ष्मण मोरे यांना 206 व गजानन मोरे यांना केवळ तेरा मते मिळाली होती. यातूनही कमीला भरती नोटा ला एक मत मिळून गेले हेच एक मत जरी मोरे लक्ष्मण यांच्या बाजूने पडले असते तर नक्कीच पाठक व मोरे यांच्या मतांची बरोबरी या ठिकाणी पाहायला मिळाले असती.
या ठिकाणी विजयी उमेदवारांना मिळालेली मते..
अमोल उघडे 287,
रूपाली देवकर 294,
कमल वाघमारे 273,
उषा जगदाळे 231,
विशाल जगदाळे 403,
शारदा साळुंखे 374,
राजुबाई जगदाळे 360,
रत्नाकर कदम 267,
प्रसाद पाठक 207