दाजी मेव्हण्याची करामत ; स्पर्धक दुकान होऊ नये म्हणुन चोरी – गुन्हा दाखल
करमाळा समाचार
निंभोरे ता. करमाळा येथे हार्डवेअरच्या दुकानात उद्घाटनापूर्वीच चोरी झाल्याने मोठी खळबळ उडाली होती. सदरच्या दुकानातून एक लाख ८१ हजार रुपयांचा मुद्देमाल हा चोरट्यांनी पळून नेला होता. सदरची घटना ही ४ एप्रिल मध्यरात्री घडली होती. याप्रकरणी पोलिसात गुन्हा दाखल झाल्यानंतर पोलिसांनी वेगवान तपास करीत संबंधित चोरांना जेरबंद केले आहे. त्यावेळी सदरची चोरी ही स्पर्धक दुकानाला थांबवण्यासाठी चोरी केल्याची बाब समोर आल्याची माहिती सहाय्यक पोलीस निरीक्षक सागर कुंजीर यांनी दिली आहे.
यश पंडित वळेकर (वय २३), करण जयवंत वाघमारे (वय १८) दोघेही रा. निंभोरे ता. करमाळा असे दोन संशयित आरोपींची नावे आहेत. तर या प्रकरणी गणेश सलगर यांनी फिर्याद दिली होती. याबाबत अधिक माहिती अशी की, निंभोरे तालुका करमाळा येथील गणेश सलगर यांनी निंभोरे येथे शेतीविषयक साहित्य व हार्डवेअर चे नवीन दुकान सुरू करण्याचे नियोजन केले होते. दि ५ एप्रिल रोजी या नवीन दुकानाचे उद्घाटन होणार होते.
परंतु ४ एप्रिल रोजी मध्यरात्री गणेश यांच्या दुकानातून साहित्य चोरीला गेले. यावेळी दुकानाचे शटर उचकटून चोरट्याने आज प्रवेश केला होता व दुकानातील तब्बल एक लाख ८१ हजार रुपयांचा मुद्देमाल घेऊन पसार झाले होते. या प्रकरणाची माहिती गणेश यांनी करमाळा पोलीस ठाण्यात नोंदवल्यानंतर करमाळा पोलिसांनी वेगवान तपास केला.
गावातीलच यश वळेकर व करण वाघमारे या दाजी मेव्हण्याच्या जोडीने मिळून हे प्रकरण घडवले असल्याचे दिसून आले. यामध्ये यश वळेकर याचे हार्डवेअरचे दुकान असून आपल्याला स्पर्धक एक दुकानदार येत असल्याचा राग मनात धरून त्यांनी हा चोरी करण्याचा डाव आखला व त्याला साथ देणारा करण वाघमारे हा त्याचा मेव्हणा असून या दोघांनी मिळून ४ एप्रिल रोजी रात्री चोरी केली. या प्रकरणातून चोरी केलेला सर्व मुद्देमाल हा मिळून आला असून सर्वच्या सर्व मुद्देमाल हाती लागला आहे.
सदरची कामगिरी उपविभागीय अधिकारी डॉ. विशाल हिरे, पोलिस निरिक्षक जोतीराम गुंजवटे यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलिस निरिक्षक सागर कुंजीर, पोलिस शिपाई नितीन चव्हाण, गणेश शिंदे, अमोल जगताप, सोमनाथ जगताप, तौफिक काझी यांच्या पथकाने पार पाडली.