सुविधा नसल्याने तेरा मुक्कामी गाड्या बंद करण्याची मागणी
करमाळा समाचार

तालुक्यातील ग्रामीण भागात तब्बल तेरा ठिकाणी वाहक व चालकांची व्यवस्था होत नसल्याने संबंधित गावातील मुक्कामी गाडी बंद करावी अशी मागणी सेवाशक्ती संघर्ष एसटी कर्मचारी संघ यांच्या वतीने करण्यात आली आहे.

करमाळा तालुक्यातील शेलगाव, आवाटी, पारेवाडी, ढोकरी, नेरले, केतुर नंबर एक, सोगाव, चिखलठाण दोन, भोगेवाडी, केम, टाकळी या गावांमध्ये मुक्कामासाठी गेल्यानंतर चालक व वाहक यांना पुरेशी विश्रांती, पिण्याचे स्वच्छ पाणी व शौचालय याची व्यवस्था केली जात नसल्याच्या वाहक व चालकाच्या तक्रारी आहेत.
सदर गावांमध्ये विविध अडचणी असून त्या सोडवण्यासाठी प्रयत्न करावेत यासाठी आगार व्यवस्थापक यांना संघटनेच्या मार्फत पत्र देण्यात आले आहे. आगार व्यवस्थापकांनी पाठपुरावा करून अडचणी दूर कराव्यात अशी मागणी केली आहे. सुविधा मिळत नसतील तर मुक्कामी गाडी बंद करावी अशी मागणी केली गेली आहे.


