उस उत्पादनात घट होण्याची भीती : शेतकरी चिंतेत
करमाळा समाचार – संजय साखरे

करमाळा तालुक्यातील ऊस पिकाला तुरा येण्याचे प्रमाण वाढल्याने शेतकऱ्यांमध्ये चिंता निर्माण झाली आहे. वर्षभर कष्ट करून उभे केलेले ऊस पिक तुरा आल्यामुळे त्याच्या गोडी, वजन आणि साखर उताऱ्यात घट होत असून त्याचा फटका शेतकऱ्यांना पर्यायाने साखर कारखानदारांना बसत आहे.

राज्यातील ऊस पट्ट्यात यंदा तुरा येण्याच्या घटना वाढल्या असून अनियमित हवामान, तापमानातील चढ उतार,दिवस-रात्र लांबीतील बदल आणि यावर्षी दीर्घकाळ चाललेला पावसाळा ही प्रमुख लक्षणे असल्याचे कृषी तज्ञांचे मत आहे.
यामध्ये को -265 या ऊस जातीला तुरा येण्याचे प्रमाण जास्त असल्याचे लक्षात येत आहे. साखर कारखान्याच्या गाळपाने आता वेग घेतला असून करमाळा तालुक्यातील कमला भवानी व शिवगिरी शुगर या साखर कारखान्यासह करमाळा तालुक्यातील ऊस ज्या साखर कारखान्यांना जातो ते सर्व साखर कारखाने आता पूर्ण क्षमतेने चालू आहेत. त्यामुळे तालुक्यातील ऊस मोठ्या प्रमाणावर गाळप होऊ लागला आहे. साखर कारखान्याने 86 0 32 या जातीच्या उसाला प्रथम पसंती दिली असून त्यानंतर 265 जातीचा ऊस तोडण्यासाठी प्राधान्य देण्यात येऊ लागले आहे. असे असले तरी संपूर्ण उसाचे गाळप केल्याशिवाय कारखाने बंद केले जाणार नाहीत याची हमी कारखान्याचे अधिकारी व कर्मचारी शेतकऱ्यांना देत आहेत.

प्रतिक्रिया
माझा गेल्या वर्षी डिसेंबर महिन्यामध्ये लागवड केलेला बारा महिन्याचा ऊस असून या उसाला आता मोठ्या प्रमाणावर तुरे आले आहेत. यामुळे वजन घटण्याची शक्यता निर्माण झाली आहे.
– आप्पासाहेब कचरे,
ऊस उत्पादक शेतकरी,
राजुरी.
प्रतिक्रिया
तुरा नियंत्रणासाठी पाण्याचे नियोजन, संतुलित खत व्यवस्थापन,तणावमुक्त पीक वाढ तसेच तुरा प्रवृत्ती कमी असलेल्या ऊस जातीची निवड हा उपाय प्रभावी ठरू शकतो.
नितीन जाधव,
सहाय्यक कृषी अधिकारी, राजुरी

