दिग्विजय बागल यांनी घेतली जलसंपदामंत्री पाटील यांची भेट
प्रतिनिधी – करमाळा समाचार
कुकडी आणि सिना कोळगाव पाणीप्रश्नासाठी दिग्विजय बागल यांनी घेतली जलसंपदामंत्री जयंत पाटील यांची भेट
करमाळा- कुकडी प्रकल्पाचे ओव्हरप्लोचे पाणी कुकडी कॅनालव्दारे सोडवण्यात येऊन मांगी तलावासोबतच कुकडी लाभक्षेत्रात येणा-या सर्व तलावात तसेच निमगाव- गांगुर्डी तलाव पूर्ण क्षमतेने भरल्यामुळे त्या तलावाचे पाणी सिना नदीव्दारे सिना- कोळगाव धरणात सोडवण्यात यावे यासाठी आज मुबंई येथे जलसंपदामंत्री जयंत पाटील यांची भेट दिग्विजय बागल यांनी घेऊन निवेदन दिले आहे.

निवेदनात म्हटले आहे की कुकडी प्रकल्पाचे ओव्हरप्लोचे पाणी कुकडी कॅनाॅलमधून तातडीने करमाळा तालुक्यातील तलावात सोडण्यात यावे. करमाळा तालुक्यात समाधान कारक पाऊस नसल्यामुळे येथील सध्याची पाण्याची अवस्था गंभीर आहे. मांगी तलाव क्षेत्रात 25 गावे असून सदरचा तलाव गेल्या 6 वर्षापासून एखादा ही न भरल्यामुळे या गावातील लोकांची आणि जनावरांची पिण्याच्या पाण्याची ही बिकट अवस्था आहे. याचबरोबर कुकडी लाभक्षेत्रात येणारे रावगाव, भोसे, वीट, कुंभेज, कुंभारगाव, हिंगणी, पोंधवडी, पारेवाडी, सावडी, राजूरी आदि तलावात पाणी सोडण्यात यावे.

सिना- कोळगाव धरण गेल्या 3 वर्षापासून भरले नसल्यामुळे आजघडीला निमगाव- गांगुर्डी तलाव पूर्ण भरला असून त्याचे पाणी सिना नदीव्दारे सिना- कोळगाव धरणात सोडण्यात यावे. सिना-कोळगाव धरण क्षेत्रावर अनेक गावे असून या गावांना ही पाण्याचा बिकट प्रश्न निर्माण झाला आहे. जर सिना नदीव्दारे पाणी या धरणात आल्यास पिण्याच्या पाण्याचा तरी प्रश्न सुटू शकतो. कुकडी प्रकल्पाचे ओव्हरप्लोचे पाणी आणि निमगाव- गांगुर्डी तलावाचे पाणी तालुक्यात त्वरीत येण्यासाठी आपण प्रत्यक्ष जलसंपदामंत्री जयंत पाटील यांना भेटून निवेदन दिले असल्याचे दिग्विजय बागल यांनी सांगितले.
आज तालुक्यात समाधानकारक पाऊस नसल्यामुळे पाण्याची मोठी समस्या निर्माण झाली आहे. कुकडीचे ओव्हप्लोचे पाणी यासोबतच निमगाव-गांगुर्डी तलाव भरल्यामुळे सिना नदीव्दारे सिना-कोळगाव धरणात पाणी यावे यासाठी आज जलसंपदामंत्री जयंत पाटील यांना प्रत्यक्ष निवेदने दिली आहेत. त्यावर त्वरीत तालुक्याला पाणी सोडण्याच्या सूचना जयंत पाटील यांनी दिल्या आहेत. जर कुकडी लाभक्षेत्र आणि सिना कोळगाव लाभक्षेत्राला पाणी मिळाले तर पाण्याचा प्रश्न सुटणार आहे
– दिग्विजय बागल,
चेअरमन मकाई, करमाळा