मनिषा साठे यांच्या तर्फे प्राथमिक शाळांना ढोल वाटप
करमाळा समाचार
सामाजिक कार्यकर्त्या सौ. मनिषा अजित साठे यांच्या तर्फे प्राथमिक शाळांना ढोल वाटप करण्याचा कार्यक्रम नगरपरिषदेच्या शाळा क्रमांक चार येथे आयोजीत करण्यात आला होता. या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी नगर पालिकेच्या शिक्षण विभागाचे केंद्रसमन्वयक श्री. दयानंद चौधरी हे होते. कार्यक्रमासाठी प्रमुख पाहुणे म्हणून सामाजिक कार्यकर्त्या सौ. मनिषा साठे , अंधश्रध्दा निर्मूलन समितीच्या जेष्ठ कार्यकर्त्या श्रीमती ज्योती पांढरे तसेच सौ. साठे यांच्या समाजकार्यात सतत त्यांच्या पाठीशी खंबीरपणे उभ्या राहणाऱ्या सौ. स्मिता आवटे मॅडम , सौ. आराधना परदेशी मॅडम आणि नोबेल इंग्लीश स्कूलच्या मुख्याध्यापिका सौ. आसादे मॅडम तसेच नगर परिषद शाळा क्रमांक चार च्या नवनियुक्त मुख्याध्यापिका सौ. चंद्रकला टांगडे मॅडम व लाभार्थी शाळांचे मुख्याध्यापक उपस्थित होते.

याप्रसंगी बोलताना सौ.साठे म्हणाल्या कि मला लहान पणापासूनच समाजकार्याची आवड होती. माझे पती श्री.अजित साठे यांनीही मला माझ्या या कार्यात सतत प्रोत्साहन व पाठबळ दिल्याने माझे हे कार्य मी अखंडपणे चालू ठेवण्यात यशस्वी झाले आहे. सरकारी शाळेत शिक्षण घेणारे विद्यार्थी हे गोरगरीबांची मुले असतात. त्या शाळांना सर्वच भौतीक सुविधा उपलब्ध होत नसतात. त्यामुळे शाळांची भौतिक साधनांची गरज लक्षात घेऊन आपणही या मुलांसाठी काहीतरी करावं असा विचार माझ्या मनात आला. स्वातंत्र्यदिन व प्रजासत्ताक दिनावेळी होणारे तालबद्ध संचलन आणि सामुदायिक कवायत माझ्या आवडीचे असल्याने या उपक्रमाला उपयोगी पडेल असे संगीत साहित्य म्हणून ढोल देण्याचे ठरवले.
प्राथमिक शाळेतच मुलांच्या अंगी असणाऱ्या सुप्त कलागुणांना वाव मिळावा आणि त्यांचे शिक्षण आनंददायी व्हावे यासाठी दहा उपक्रमशील शाळांची निवड करून त्यांना आज ढोल वाटप करण्यात आले. जिल्हा परिषदेच्या पोथरे , जातेगाव , पांडे ,खडकेवाडी , आळजापूर , करंजे ,पिंपळवाडी आणि नगरपरिषदेच्या शाळा क्रमांक ४ व कै .सा .ना जगताप मुला मुलींची शाळा तसेच नोबल इंग्लीश स्कूल करमाळा या शाळांना या ढोलचे वाटप सौ.मनिषा साठे यांच्या हस्ते करण्यात आले.

यावेळी सौ.टांगडे मॅडम यांची मुख्याध्यापिका म्हणून नियुक्ती झालेबद्दल सौ.साठे यांच्या हस्ते त्यांचा सत्कार करण्यात आला. तर जिल्हा परिषद शाळांच्या वतीने करंजे शाळेचे मुख्याध्यापक श्री.लष्कर सर यांच्या हस्ते सौ.साठे यांचा यथोचित सत्कार करण्यात आला.
याप्रसंगी शकूर शेख सर यांनी आपल्या भाषणातून सौ.साठे मॅडम यांच्या आपल्या मुलीचा वाढदिवस मूक बधिर शाळेतील मुलांसमवेत, अपंगासाठी सायकल वाटप करून तर स्वतःचा वाढदिवस अनाथाश्रमातील लोकांना आवश्यक साहित्याचे वाटप करून समाजासमोर अनुकरणीय असा आदर्श निर्माण करणाऱ्या साठे कुटुंबियांच्या कौतुकास्पद कार्याचे कौतुक करून त्यांना दिर्घायुष्य लाभो अशी ईच्छा व्यक्त केली. यावेळी श्री.गभाले सर , श्री.लष्कर सर ,सौ.टांगडे मॅडम आणि श्री.चौधरी सर यांनी आपली मनोगते व्यक्त केली.
या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन श्री. संतोष माने सर यांनी केले.कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी श्री.मुकुंद मुसळे सर आणि श्री.बाळू दुधे सर यांनी परिश्रम घेतले. कार्यक्रमाचे आभार श्रीमती भोसले मॅडम यांनी मानले.