श्री अदिनाथच्या कर्मचाऱ्यांवर दुहेरी संकट ; पगारीसाठी संघर्ष करणाऱ्या कर्मचाऱ्यांवर अंधाराचे सावट
प्रतिनिधी सुनिल भोसले
करमाळा तालुक्यातील आदिनाथ सहकारी साखर कारखान्यातील कामगारांच्या पगारी मिळावेत म्हणून अनेक आंदोलने मोर्चे काढत संघर्ष चालू असताना आता आदिनाथ कारखान्यातील सर्व कर्मचारी कामगार अंधाराशी सामाना करत आहेत. महावीतरण कंपनीचे कारखान्याकडे थकित वीज बील 38 लाख रुपये थकले असल्याने महावीतरण कंपनीने आदिनाथ कारखान्याचे वीज कनेक्शन तोडल्याने कारखाना परिसरात गेल्या चार दिवसांपासून अंधार आहे.

करमाळा तालुक्यातील शेलगाव भाळवणी आदिनाथ कारखाना आर्थिक संकटात सापडल्याने शिखर बँकेने कारखाना लिलावात काढून आमदार रोहित पवार यांच्या बारामती अॅग्रोने भाडेकराराने घेतलेला आहे. पण अद्याप बारामती ॲग्रो आदिनाथ कारखान्याचा ताबा घेतला नाही. आदिनाथ कारखाने संपूर्ण कामकाज सध्या बंदच असल्याने कारखान्यावर 38 लाखाचे वीज बील थकीत आसल्याने कंपनीने कारखान्याचा वीज पुरवठा खंडित केला आहे.

वीज पुरवठा नसल्याने कारखान्याच्या फॅक्टरी शेड कारखान्यातील कर्मचारी कामगार तसेच काॅलनीसह संपूर्ण परिसर अंधारात आहे. कामगार कॉलनीमध्ये जवळपास 200 कामगार वास्तव्यात आहेत. कामगारांना गेल्या तीन वर्षांपासून पगारी नाहीत ते पगारी साठी संघर्ष करत असता आता त्यांना लाईट नसल्याने पाण्याचीही अडचण होणार आहे.
कारखान्याचे एम. डी. यांच्याशी संपर्क साधला असता ते म्हणाले दिनांक 13 तारखेपासून कारखान्याची लाईट बंद असल्याने मी सुद्धा अंधारात आहे.
तर कारखान्याचे चेअरमन धनंजय डोंगरे म्हणाले, आमचा वीज जोडण्याचा प्रयत्न चालू आहे. लवकरात लवकर लाईट जोडण्याचे प्रयत्न सुरु आहेत.