ग्रामस्थांच्या सतर्कतेमुळे ठेकेदाराला भुर्दंड ; केलेले काम पुन्हा करण्याची वेळ
करमाळा समाचार
दिवेगव्हाण तालुका करमाळा येथे प्रतिपंढरपूर म्हणून भव्य दिव्य असे मंदिर उभारण्यात आल्यानंतर त्यासमोर तसेच गावातीलच मशिदी समोरील रोजगार हमी योजनेतून पेव्हर ब्लॉक टाकण्याचे काम करीत असताना निकृष्ट दर्जाचे काम केल्याबाबत ग्रामस्थांची तक्रार होती. पण तक्रारीकडे अपेक्षित असं लक्ष दिले जात नव्हते. त्यावेळी ‘लाडका ठेकेदार’ या मथळ्याखाली बातमी प्रसिद्ध करण्यात आली होती. त्यानंतर संबंधित अधिकारी व ठेकेदाराने कामाच्या ठिकाणी जाऊन पाहणे केली व काम पुन्हा एकदा करून देतो असे सांगितले.

त्यानंतर आज दि १२ प्रत्यक्षात कामाला सुरुवात झालेली दिसून आले. त्यामुळे दिवेगव्हाण ग्रामस्थांच्या वतीने समाधान व्यक्त करण्यात येत आहे. मुळातच एखादे काम शासनाकडून होत असताना त्यावर लक्ष देणे ही अधिकाऱ्यांची जबाबदारी असते. ग्रामस्थ आपल्या रोजच्या कामात व्यस्त असतात. त्यांना या गोष्टींकडे लक्ष देणे जमत नसते. त्याशिवाय आपण का वाईटपणा घ्यायचा या कारणांनी अनेक जण त्याकडे दुर्लक्ष करतात. पण काही दिवसातच सदरचे काम खराब होऊन जाते आणि पुन्हा एकदा ग्रामस्थ त्याच रस्त्यांची किंवा त्या कामाची मागणी करू लागतात. पण जेव्हा काम सुरू असते त्यावेळेस मात्र कोण लक्ष देत नाही.

याला अपवाद ठरले ते दिवेगव्हाण येथील ग्रामस्थ. ज्यावेळी सदरचे काम सुरू होते. गावकरी त्या ठिकाणी त्या कामावर लक्ष ठेवून होते. तसेच सदर कामाबाबत वारंवारता करत होते. त्यामुळे सदरची बाब चव्हाट्यावर आली आणि आता मात्र त्यावर पुन्हा एकदा काम करण्याची वेळ ठेकेदाराला आली आहे. सुरुवातीलाच काम व्यवस्थित केले असते तर दुसऱ्यांदा हे काम करण्याची गरज ठेकेदाराला पडली नसती. त्यामुळे त्यालाही भुर्दंड सोसावा लागणार आहे. याबाबत तक्रारदार माऊली खाटमोडे व गावकरी रोज अपडेट घेत होते व आता काम सुरु झाल्यानंतर त्यांनी समाधान व्यक्त केले आहे.