Dysp अंजना कृष्णा यांचे अवैध धंद्यावर सर्जीकल स्ट्राईक ; स्थानिकांच्या भुमिकेवर प्रश्नचिन्ह
करमाळा समाचार

करमाळा तालुक्यात मोठ्या प्रमाणावर अवैध व्यवसाय सुरू असताना सहाय्यक पोलीस अधीक्षक श्रीमती अंजना कृष्णा यांच्या विशेष पथकाने ‘सर्जिकल स्ट्राइक’ करत तालुक्यातील वाशिंबे, सावडी आणि विहाळ या ठिकाणी धाडी टाकत अवैध मद्य विक्रीचा पर्दाफाश केला. या कारवाईनंतर करमाळा पोलिस प्रशासनाच्या भूमिकेवर प्रश्नचिन्ह उपस्थित केले जाऊ लागले आहेत. विशेष पथकाला संबंधित धंदे मिळून आले. स्थानिक पोलीस कुठे व्यस्त आहेत असा प्रश्न विचारला जात आहे.

मागील बऱ्याच दिवसांपासून करमाळा तालुक्यात बनावट दारू विक्री होत असल्याच्या तक्रारी आहेत. त्यातील काहींना बाहेरील पोलिसांनी ताब्यातही घेतले. बनावट दारूचा साठा सापडल्यानंतर करमाळ्यातून दारू तयार करणाऱ्यालाच पुणे पोलिसांनी ताब्यात घेतले. तरीही स्थानिक पोलिसांना याची कल्पना नव्हती असं आपण मनाची समजूत घालून घेतली. परंतु नंतरही तालुक्यात अवैधरित्या मध्यविक्री केली जात असल्याचे सदरच्या प्रकरणावरून उघडकीस येत आहे.
दिनांक 5 रोजी एकाच दिवशी वेगवेगळ्या ठिकाणी छापा टाकत श्रीमती अंजना कृष्णा यांच्या विशेष पथकाने अवैध धंद्यावर सर्जिकल स्ट्राइक करीत मोठ्या प्रमाणावर मध्ये साठा जप्त केला आहे. त्यात वाशिंबे येथे हाय प्रोफाईल ब्रँडचा साठा जप्त केला. त्यात उमरड येथील निलेश बदे याला ताब्यात घेतले. तर त्याच्याकडून जेऊर येथील गायकवाड देशी दारू दुकान व हॉटेल लोकप्रिय येथून बेकायदा विक्रीसाठी मद्य आणल्याची त्यांनी माहिती दिली.

इतर कारवायांमध्ये सावडी येथे हातभट्टी तयार करत असलेल्या व्यक्तीला ताब्यात घेण्यात आली. तर सावडी येथे देशी दारू अवैधरित्या विकणाऱ्याला ताब्यात घेण्यात आले. मोरवड रस्त्यावर टपरीतूनही दारू विक्री केली जात होती. त्यालाही विशेष पथकाने ताब्यात घेत सदरच्या सर्व कारवाया पूर्ण केल्या. यातून मोठ्या प्रमाणावर मद्य साठा ताब्यात घेण्यात आला असून सदरची दारू बनावट आहे का याचाही तपास होणे गरजेचे असून त्याच्या मुळाशी जाणे महत्त्वाचे आहे.
सदरची कारवाई सहाय्यक पोलीस अधीक्षक श्रीमती अंजना कृष्णा व्ही.एस. यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस हवालदार रवी लोकरे, पोलीस कॉन्स्टेबल अनिल निकम, पोलीस कॉन्स्टेबल मंजीत भोसले, पोलीस कॉन्स्टेबल संभाजी पवार, पोलीस कॉन्स्टेबल गणेश गुटाळ यांनी फत्ते केली आहे.

