भटक्या समाजाच्या विकासासाठी शासनाकडून प्रयत्न आवश्यक – रामकृष्ण माने
प्रतिनिधी करमाळा
दि. १४- भटक्या विमुक्त जाती – जमाती समाज घटकातील नागरिक स्वातंत्र्याच्या ७५ वर्षे काळातही विकास प्रक्रियेपासून दूर आहेत. ना घर, ना जमीन, ना नोकरी अशा अवस्थेतील हे बांधव पोटाची खळगी भरण्यासाठी भटकंती करत आहेत. त्याचा विचार करता आर्थिक, सामाजिक, शैक्षणिक उन्नतीसाठी अनुसुचित जाती, जमातीप्रमाणे भटक्या विमुक्त जाती – जमाती घटकांच्या विकासासाठी शासनाकडून प्रयत्न झाले पाहिजेत. असे मत भटके विमुक्त जाती व आदिवासी ज्ञानपीठ संस्थेचे अध्यक्ष, सामाजिक कार्यकर्ते रामकृष्ण माने यांनी व्यक्त केले.

करमाळा शहर परिसरात उतरलेल्या भटकंती करणाऱ्या समाज बांधवांच्या पालावर जावून माने यांनी देशाचे स्वातंत्र्य यासह भटकंती करणाऱ्या समाज घटकांच्या व्यथा याविषयी चर्चा केली. त्यावेळी ते बोलत होते. याप्रसंगी सुरुवातीला स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवानिमित्त माने यांच्याकडून उपस्थितांना तिरंगा ध्वजाचे वाटप करुन देशाचा अभिमान बाळगण्याचे आवाहन करण्यात आले.

पुढे बोलताना माने यांनी, देश स्वतंत्र होणे ही फार महत्वाची घटना आहे. त्याचवेळी स्वातंत्र्योत्तर काळात सर्व समाज घटक विकासाच्या प्रक्रियेत येणेही आवश्यक होते. मात्र अजूनही भटक्या जाती – जमाती समाज घटकांची पोटाची भूक भागविण्यासाठी भटकंती संपली नाही. त्यांच्या जीवनाला स्थैर्य मिळण्यासाठी शासनाकडून ठोस कार्यवाहीची अपेक्षा आहे. असे सांगितले. यावेळी किशोरकुमार शिंदे, कुमार पाटील यांनी उपस्थितांना शिक्षणाचे महत्व सांगितले. याप्रसंगी हनुमंत वाकुडे तसेच भटक्या विमुक्त जाती – जमाती समाजातील बांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते.