करमाळाताज्या घडामोडीसोलापूर जिल्हासोलापूर शहर

महसुलने कारवाई केलेले दहा पैकी आठ आजही मोकाट ; तहसिलदार ठोकडे यांची पोलिसांच्या कार्यपद्धतीवर नाराजी

करमाळा – प्रतिनिधी

तालुक्यात वाळू उपसा, वाळू वाहतूक व मुरूम खनन गंभीर प्रकारचे गुन्हे सर्रास घडताना दिसतात. यावर महसूल विभागाने कारवाई करत मागील वर्षभरात जवळपास दहा ठिकाणी कारवाई केली. पण केवळ दोघांनाच यातील अटक झाल्याने पोलिसांच्या कार्यपद्धतीवर प्रश्नचिन्ह उपस्थित होत आहे. यासंदर्भात तहसीलदार शिल्पा ठोकडे यांनीही उपविभागीय अधिकारी अंजना कृष्णा यांच्याकडे नाराजी व्यक्त केली असल्याचे दिसून येते.

करमाळा तालुक्यात उजनी जलाशय तसेच सीना नदी या ठिकाणाहून मोठ्या प्रमाणावर वाळू उपसा होताना दिसून येतो. यासंदर्भात तहसीलदार शिल्पा ठोकडे यांच्या वतीने वेळोवेळी कारवाई करण्यात आलेली आहे. त्यामध्ये कंदर भागात मोठ्या प्रमाणावर कारवाई झाल्याचे दिसते. तर वाळू वाहतूक करताना धाराशिव जिल्ह्यातील आंबे येथील एकावर गुन्हा दाखल झालेला आहे. तर बिटरगाव व मांगी येथे वाहतूक व मरून उत्खनन होत असल्याचे दिसून आल्याने कारवाई करण्यात आली होती.

मागील वर्षभरात जवळपास दहा ठिकाणी वेगवेगळ्या भागात कारवाई करण्यात आली. पण आजपर्यंत यात केवळ दोघांना अटक झाल्याने नेमके तपास कोणत्या दिशेने सुरू आहे हा प्रश्न उपस्थित होत आहे. संबंधित वाळू माफिया हे मोकाट असल्याने ते आजही वाळू उपसा करत असल्याची माहिती समोर येत आहे. त्यामुळे पोलिस प्रशासनाची त्यांच्यावर मेहरबानी कशामुळे हा मोठा प्रश्न आहे.

ज्या ठिकाणी तालुक्याच्या प्रमुख तहसीलदार यांनी कार्यवाही करूनही जर त्यावर पुढील प्रक्रिया पार पडली जात नसेल तर हा गंभीर प्रश्न आहे. वाळू उपश्यावर महसुल तहसीलदार यांनीच वचक ठेवला पाहिजे असे असले तरी पोलीस प्रशासनाकडून योग्य ते सहकार्य लाभले तरच महसूल विभाग कारवाई करू शकतो असे दिसून आलेले आहे. त्यामुळे यापुढे पोलीस काय भूमिका घेतात याकडे लक्ष लागून राहील. मागील सहा ते बारा महिन्यापासून मोकाट असलेल्या वाळू माफ यावर कार्यवाही लवकरच होईल अशी अपेक्षा करू.

सोशल मिडियात फोटो व्हायरल नंतर अटक ….
यातील एका प्रकरणात वाळू वाहतूक प्रकरणात गुन्हा दाखल असलेला संशयित आरोपी हा कंदर गावात राहत असून जिल्हा परिषद पंचायत समिती निवडणुकांमध्ये उघडपणे प्रचार करताना दिसून आला होता. त्याचे फोटो समाज माध्यमातून व्हायरल झाल्यानंतर पोलिसांना जाग आली व संबंधित ठिकाणी जाऊन संशयित आरोपीला अटक करण्यात आली होती. परंतु तो त्याच गावात बऱ्याच दिवसांपासून वास्तव्य करत होता व याबाबत पोलिसांच्या गोपनीय सूत्रांना पुसटची सुद्धा कल्पना मिळाली नाही हे विशेष. संबंधिताला अटक झाल्यानंतर समाधान व्यक्त झाले. परंतु त्याच्यावर मेहरबानी कोणाची हा आजही प्रश्न तसाच आहे.

error: परवानगी शिवाय बातमी कॉपी करू नये. हा कायद्याने गुन्हा आहे !
WP Radio
WP Radio
OFFLINE LIVE